नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यावरून कॉंग्रेसने भाजपवर टीका सुरु केली. मात्र, कॉंग्रेसच्या या टीकेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दादा दादी, आजी आजोबा यांना भारतरत्न द्यायला ही काँग्रेस नाही. हा भाजप आहे. ज्यांनी ज्यांनी देशासाठी योगदान दिले आहे त्यांना सन्मानित करणार आणि केलेच पाहिजे स्पष्ट आणि परखड मत अमित शाह यांनी व्यक्त केलं. Tv9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात ते बोलत होते.
भारतरत्न पुरस्काराचा क्रम तुम्ही पाहिला नाही का? आधी भारतरत्न दिला. नंतर हे लोक आमच्यासोबत आले म्हणून दिला असे नाही. भाजपने काँग्रेसच्याही अनेक लोकांना भारतरत्न दिला आहे. नरसिंहराव आणि तरुण गोगोईं यांना भारत रत्न दिला. त्यातून आम्हाला काय मिळणार? असा सवाल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केला.
सरदार पटेल यांना भारतरत्न देण्यासाठी किती वर्ष लागले. चंद्रशेखर सत्तेत आले नसते तर कदाचित तो ही मिळाला नसता. भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांवर ज्यांचा अधिकार आहे त्यांनाच हा पुरस्कार दिला आहे. पूर्वी तर पत्रकारांच्या शिफारशींवरही पुरस्कार दिला जायचा असेही त्यांनी सांगितले.
मोदी यांनी कार्यकर्त्यांसमोर लक्ष ठेवलं आहे. जनतेला विनंती केली आहे 370 जागा निवडून देण्याचं. हे मोदी यांचे लक्ष आहे. ते आम्ही पार पाडू. भाजप ईस्टमध्ये नाही असे काही पंडित सांगत होते. परंतु, आज ईस्टमध्ये भाजप आहे. त्या पंडितांचे ऐकलं असतं तर आम्ही दोनचे दोनच राहिलो असतो. आज बंगालपासून तेलंगणापर्यंत गेलो आहोत. कोणत्या पंडिताने समीक्षा केली होती. देशाचा भाजपवर विश्वास आहे. देश एक आहे त्यामुळे आम्हाला सीट मिळतील आणि आम्ही 400 पार जाऊ, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मोदी यांनी 2014 पासून वेळोवेळी कडक निर्णय घेतले. वन रँक वन पेन्शनचा निर्णय, त्यानंतर नोटबंदीचा निर्णय घेतला. यूपीच्या निवडणुकामध्ये आम्ही सर्वाधिक सीट जिंकल्या. त्यानंतर आम्ही जीएसटी आणला. तेव्हाही नावं ठेवली जात होती. आज जगालाही आश्चर्य वाटलं. जनधन आणलं, आधार आणलं, मोबाईल आणला. डिजीटल इंडिया साकार केले. मोदी यांनी देशात परिवर्तन आणलं. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केले. मोदींनी ठाम निर्णय घेतला आणि तीन तलाकचा कायदा संपुष्टात आणला याकडेही अमित शहा यांनी लक्ष वेधले.
रिलीजिअस मायनॉरिटीला नागरिकत्व देण्याचं नेहरूचं स्वप्न होतं. आम्ही ते पूर्ण केलं. आम्ही काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. तीस वर्षानंतर आम्ही नवं शैक्षणिक धोरण आणलं. ४० वर्षापासून महिलांच्या आरक्षणाची चर्चा होती. कोणी देत नव्हतं. आम्ही महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं. त्यांचा धोरणांमध्ये सहभाग आणला. न्याय संहिता, नागरिक संहिता, भारतीय साक्ष संहिता आम्ही इंग्रजांचे कायदे रद्द केले. राम मंदिर उभारलं.