बारामतीत एक पाडवा अन् दुसरा पळवा; काँग्रेस नेत्याचा अजितदादांना टोला

| Updated on: Nov 02, 2024 | 4:16 PM

लोकसभेत यांनी एका एका मतदारसंघात 50-50 कोटी रुपये खर्च केले होते. तरी पडले. हे काय गाफील राहणं आहे का? सरकार विरोधात असंतोष होता, तो लोकसभेत दिसून आला आणि त्यापेक्षा दुप्पट असंतोष विधानसभेमध्येही दिसून येईल अशीही टीका कॉंग्रेसच्या या नेत्याने केली आहे.

बारामतीत एक पाडवा अन् दुसरा पळवा; काँग्रेस नेत्याचा अजितदादांना टोला
Ajit Pawar
Follow us on

महाराष्ट्राची अधोगती होत आहे असा आरोप आम्ही करीत होतो, तेव्हा भाजप आणि सरकार आमचे आरोप खोटे आहेत असे खंडन करीत होते, मात्र आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालात महाराष्ट्राची आर्थिक घसरण किती झाली आहे ? हे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्र क्रमांक एकवर होता. मात्र मागील दहा वर्षात विविध क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. तेलंगणा, गुजरात, कर्नाटक,हरियाणा, तामिळनाडू ,पंजाब ही राज्ये आपल्या पुढे गेली आहेत. गेल्या दशकात महाराष्ट्रात 20,000 शेतकऱ्यांचे आत्महत्या झाल्या असताना यांना लाज नाही. महाराष्ट्राला खड्ड्यात टाकून, आर्थिक दृष्ट्या उध्वस्त करून हे मत मागत फिरत आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान यांनी गुजरातचे चरणी अर्पण केला आहे.हेच या पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालातून स्पष्ट होत आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

शरद पवार यांनी निवडणूक काळात पोलिसांच्या व्हॅनमधून कोट्यवधी रुपयांचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप केला आहे. यावर प्रतिक्रीया देताना विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार जे म्हणाले हे खरं आहे. अनेक ठिकाणी पैसे पकडले गेले आहेत. हेलिकॉप्टर म्हणून पैसे पोहोचवण्याचे काम झालेले आहे. बॅगा उचलायला दोन दोन माणसं लागतात का? नियमांचा, आचारसंहितेचा भंग करून पैशाच्या बळावर सत्ता काबीज करायला हे निघाले आहेत आणि त्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे, जिथे एबी फॉर्म हेलिकॉप्टरने पाठवले जातं आहेत.. तिथे पैसा पाठवण्यासाठी पोलिसांच्या गाडीचा वापर होणार नाही हे कशावरून अशा सवाल वडेट्टीवर यांनी केला आहे.

‘एक पाडवा आणि दुसरा पळवा’

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर काका आणि पुतण्याने स्वतंत्र दिवाळी पाडवे साजरे केल्याने पवार कुटुंबात ऐन दिवाळीतही दोन गट पडल्याचे दिसून आले.यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही पक्ष वेगळे आहे, म्हणून दोन पाडवे होणे स्वाभाविक आहे. मात्र त्यापैकी ‘एक पाडवा आणि दुसरा पळवा’ असा आहे अशी मिश्कील कोटीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.विजय वडेट्टीवर पुढे म्हणाले की अजित पवारांची स्थिती अशी झाली आहे की, धरलं तर चावते, सोडलं तर पळते. ते कुठेही गेले तरी खड्ड्यात पडणार अशी अवस्था त्यांची त्यांनी करून ठेवली आहे.त्यामुळे जयंत पाटील जे बोलले, ते चांगल्या शब्दात बोलले आहे.ही ब्लॅकमेलिंग नाही, तर हवं त्या पद्धतीने भाजपाकडून अजित पवारांचा वापर करून घेतला जात आहे. बहुजनांना वापरायचं आणि फेकायचं ही भाजपची पॉलिसीच आहे अशीही टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली आहे.