नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात मोठे बदल होत आहेत. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही देशांनी वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालवधी वाढवला आहे. भारताने देखील 14 एप्रिलला संपणारा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला आहे. या व्यतिरिक्त कोरोनाने जगभरात अनेक प्रसिद्ध व्यक्तींनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात होत असलेल्या बदलांचा हा आढावा (Corona effect in World).
1. जे अमेरिकेत सेटल होण्याच्या विचारात आहेत, त्यांना अजून तरी अनिश्चित काळासाठी थांबावं लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प लवकरच याबाबत निर्णय घेणार आहेत. कोरोनामुळे अमेरिकन लोकांच्या नोकऱ्यांवर संकट ओढावलंय. त्यामुळे बाहेर देशातून जे अमेरिकेत कायमस्वरुपी नोकरीसाठी येतात, त्यांना अमेरिका काही काळ बंदी घालणार आहे. एका माहितीनुसार कोरोनामुळे अमेरिकेत दीड कोटी नोकऱ्या गेल्या आहेत.
2. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची तब्येत खालावली असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांमधून प्रसिद्ध् झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी किम जोंगची हार्ट सर्जरी झाली होती. मात्र अद्यापही किंम जोंगच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नसल्याचं सांगितलं जातंय.
3. दरम्यान, किम जोंग यांची प्रकृती सुधारली नाही तर त्यांच्या बहिणीकडे उत्तर कोरियाची सूत्रं जाणार असल्याची माहिती आहे. किम यो जोंग असं त्यांच्या बहिणीचं नाव आहे. ती आधीपासून किम जोंग यांची सल्लागार म्हणून काम पाहते. म्हणूनच किम जोंग यांनी आपल्या बहिणीलाच राजकीय वारसदार म्हणून नेमल्याची चर्चा आहे.
4. काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांना भेटलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचं समोर आलंय. संबंधित व्यक्ती पाकिस्तानच्या एधी फाऊंडेशनशी संबंधित आहे. 15 एप्रिलला त्यांनी 1 कोटी रुपयांच्या मदतीचा चेक इम्रान खान यांच्याकडे सोपवला होता. मात्र त्यानंतर मदत देणारा व्यक्तीच कोरोना पॉझिटिव्ह निघाला. सध्या पाकिस्तानात 9 हजार 200 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
5. भारतात 20 एप्रिलला एकाच दिवशी 705 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. कोरोनापासून एका दिवसात इतके रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच घटना आहे. सध्या संपूर्ण देशात राज्य म्हणून महाराष्ट्र आणि शहर म्हणून मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यानंतर इंदुर शहरातही कोरोनाग्रस्तांची संख्या रोज वाढतच आहे.
6. श्रीलंकेनं देशात होणाऱ्या निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलल्या आहेत. आता श्रीलंकेतील निवडणूक 20 जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेत आतापर्यंत 307 लोक कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी 98 लोक बरे झाले आहेत. श्रीलंकेची लोकसंख्या सव्वादोन कोटींच्या घरात आहे.
7. रशियात एचआयव्हीच्या गोळ्यांचा काळाबाजार सुरु झाल्याचं स्थानिक माध्यांमानी छापलंय. काही घटनांमध्ये एचआयव्हीच्या गोळ्यांचा डोस कोरोना उपचारात सहाय्यक मानला जातोय. सध्या रशियात 47 हजारांहून जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.
8. इटलीत 20 एप्रिलला पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात इटलीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत रोज कोरोनाग्रस्तांची संख्येत वाढच होत होती. मात्र आता पहिल्यांदाच इटलीला काहीसा दिलासा मिळाला आहे. इटलीत सध्या 1 लाख 81 हजार कोरोनाचे रुग्ण आहेत.
9. सिंगापूरमध्ये एकाच दिवशी नवे 1100 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तिथला लॉकडाऊन आता थेट 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. याआधी तिथंही भारताप्रमाणे 3 मेपर्यंत लॉकडाऊन होता. मात्र आता तो थेट 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. सिंगापूरमधल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 8 हजारांहून अधिक आहे.
10. आम्ही अपराधी नाहीत, तर पीडित आहोत, असं उत्तर चीननं अमेरिकेला दिलं आहे. ट्रम्प यांनी चीनमध्ये एक अमेरिकन शास्रज्ञांची टीम पाठवून कोरोनाच्याच चौकशीची मागणी केली होती. त्यावर चीननं हे उत्तर दिलंय.
11. कोरोना कसा पसरला? कोरोनाचा पहिला रुग्ण नेमका कधी सापडला? या सर्व प्रश्नांची खरी उत्तरं चीननं द्यायला हवीत, अशी मागणी जर्मनीच्या चान्सलर मर्केल यांनी केलीय. खरी माहिती समोर आली, तर त्याचा जगाला फायदाच होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत.
12. कोरोनाबाबतीत तुर्कीनं चीनलाही मागे टाकलं आहे. चीनवगळता मध्य आशियातले इराण आणि तुर्की या दोन्ही देशांमध्ये झपाट्यानं कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या तुर्कीत 90 हजारांहून जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.
13. ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोनाचा दुसरी लाट येऊ शकतो, अशी भीती तिथल्या सरकारला आहे. म्हणून लॉकडाऊनमधून कोणतीही सूट दिली जाणार नाही. ब्रिटनमध्ये सध्या 1 लाख 24 हजार लोकांना कोरोना झाला आहे.
14. स्पेन आणि फ्रान्स या दोन्ही देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण कमी झालंय. थेट आयसीयूत भर्ती करावं लागणाऱ्यांच्या संख्येत सलग 11 व्या दिवशी घट नोंदवली गेलीय. सध्या स्पेनमध्ये 2 लाखांहून जास्त कोरोनारुग्ण आहेत. आणि स्पेन कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
15. जर कंपन्यांनी लोकांना सुट्टीवर पाठवलं असेल, तर त्या लोकांचा 80 टक्के पगार ब्रिटनचं सरकार स्वतः देणार आहे. पगारासाठी कोण पात्र असेल, त्याचं प्रमाण किती असेल, याचे सर्व निकष सुद्धा ठरवण्यात आले आहेत. द गार्डियननं ही बातमी दिलीय.
संबंधित बातम्या:
कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी
‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी
दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी
Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय
Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय
Corona effect in World