चंद्रपूर : मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी येथून चंद्रपूरला आलेला एक युवक कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे (Corona infection in Chandrapur). हा युवक 25 मे रोजी विमानाने मुंबईतून नागपूरला आला होता. नागपूर, चंद्रपूर, राजुरा प्रवास केल्यानंतर त्याला 25 मे रोजी राजुरा येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र, त्याला 30 मे रोजी लक्षणं दिसू लागली. यानंतर त्याच दिवशी त्याचा स्वॅब नमुना घेऊन कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आला. 31 मे रोजी आलेल्या अहवालात या युवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं.
संबंधित युवकाला सध्या चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. चंद्रपूरमध्ये 2 मे – 1 रुग्ण, 13 मे – 1 रुग्ण, 20 मे – एकूण 10 रुग्ण, 23 मे – एकूण 7 रुग्ण, 24 मे – एकूण 2 रुग्ण, 25 मे – 1 रुग्ण, 31 मे – 1 रुग्ण अशा प्रकारे जिल्हयात 23 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत 12 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 23 पैकी 11 रुग्ण कोरोना अॅक्टीव्ह आहेत.
जिल्ह्यात 11 कंटेनमेंट झोन
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरपन आलेल्या नागरिकांची एकूण संख्या 72 हजार 854 इतकी आहे. कोविड-19 संक्रमित रुग्णांची संख्या 23 असून यापैकी 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 11 आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात 9 आणि महानगरपालिका क्षेत्रात 2 असे एकूण 11 कंटेनमेंट झोन कार्यान्वित होते. जिल्ह्यांत 11 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकांमार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यात 12 हजार 69 नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात आणि गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच, आयएलआय, सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामस्तरावर 3 हजार 483 नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर 460 नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करणयात आले आहे. जिल्हास्तरावर 311 नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण जिल्ह्यातील 4 हजार 254 नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. तसेच, 63 हजार 654 नागरिकांचे गृह विलगीकरण पूर्ण झाले आहे. 9 हजार 200 नागरिकांचे गृह विलगीकरण सुरु आहे.
संबंधित बातम्या :
राज्यातील रेल्वेसेवा अंशत: सुरु, मुंबई-पुण्यातून प्रत्येकी 5 ट्रेन सुटणार, प्रवासासाठी नियम काय?
गिरगावातील प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू, फॅमिली डॉक्टरच्या निधनाने बॉलिवूडचं कपूर कुटुंब शोकात
Corona infection in Chandrapur