भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये रुग्णवाहिकेच्या चालकाचा हलगर्जीपण समोर आला (Corona Patient death in Ambulance Bhopal) आहे. रुग्णवाहिकेचा चालक कोरोना रुग्णाला रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये सोडून निघून गेला. त्यानंतर जोपर्यंत रुग्णालयाचे कर्मचारी तिथे पोहोचले, त्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीतून समोर आली आहे. मयत हा एका विद्युत कंपनीचा कर्मचारी आहे. वाजिद अली असं मृताचे नाव (Corona Patient death in Ambulance Bhopal) आहे.
रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यात सोडल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
“वडिलांचे पार्थिव एक तास रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये पडून होते. अशी वागणूक जनावरांसोबतही दिली जात नाही”, असं मयत कोरोना रुग्णाच्या मुलाने सांगितले.
ही घटना समोर आल्यानंतर भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. भोपाळचे सीएमएचओ डॉ. प्रभाकर तिवारी या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.
59 वर्षीय वाजिद अली यांना 23 जून रोजी किडनीच्या त्रासामुळे भोपाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. काल (6 जुलै) त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पिपल्स रुग्णालयात कोरोनावर उपचार होत नसल्याने त्यांना चिरायू रुग्णालयात हलवण्याचे ठरले. यानंतर चिरायू रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने रुग्णाला नेत असताना अचानक रुग्णाची परिस्थिती गंभीर झाल्याने रुग्णावाहिका पुन्हा पिपल्स रुग्णालयात परतली.
“वडिलांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर वडिलांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी चिरायू रुग्णालयाकडे जाण्यास निघाली. पण तीन तासानंतर त्यांचा मृतदेह फुटपाथवर पाहिला”, असं मयत रुग्णाच्या मुलाने सांगितले.
“आम्हाला रुग्णाची परिस्थिती आणि व्हेंटिलेटर नसलेल्या रुग्णावाहिकेबाबत काही सूचना दिलेली नव्हती. रुग्णवाहिकेच्या चालकाला समजले की, रुग्णाची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यानंतर रुग्णवाहिकेचा चालक पुन्हा पिपल्स रुग्णालयात परतला. आम्ही 20 मिनिटांनी व्हेटिंलेटर असलेली रुग्णवाहिका पाठवली”, असं चिरायू मेडिकल कॉलेजचे निदेशक डॉ. अजय गोयंका यांनी सांगितले.
“पिपल्स रुग्णालयाचे अधिकारी यूके दीक्षित यांनी या घटनेसाठी चिरायू रुग्णालयाला जबाबदार ठरवले आहे. आमच्याकडे कोरोनावर उपचार होत नाही. चिरायूची रुग्णवाहिका अर्ध्यातून रुग्णालयात परतली. रुग्णाचा मृत्यू कदाचित रस्त्यात झाला असावा. आम्ही पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. आमच्याकडे व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे”, असं पिपल्स रुग्णालयाचे अधिकारी यूके दीक्षित यांनी सांगितले.
“वाजिद अली यांचा काल कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर कोरोनावरील उपचारासाठी आम्ही त्यांना चिरायू रुग्णालयात नेण्याचे ठरवले. अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही की रुग्णाचा मृत्यू केव्हा आणि कधी झाला. पण सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये रुग्णवाहिकेचा चालक रुग्णाला उतरवत आहे. रुग्णाचे पार्थिव पिपल्स रुग्णालयाबाहेर संध्याकाळी 7 वाजता मिळाले”, असं वाजिद अली यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले.
संबंधित बातम्या :