मुंबई : राज्यभरातील पोलिसांभोवती कोरोनाचा विळखा वाढताना दिसत (Corona Positive Police) आहे. कारण एका दिवसात तब्बल 87 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल 618 वर पोहोचली आहे. आतापर्यंत पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. (Corona Positive Police)
सुदैवाची बाब म्हणजे काल एकाच दिवसात 20 पोलीस कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधित पोलिसांची संख्या वाढत आहे. बुधवारी 6 मे रोजी 38, गुरुवारी 7 मे रोजी 36 आणि आज शुक्रवारी 8 मे रोजी एका दिवसात 87 पोलिसांना लागण झाली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसात 161 पोलिसांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, एकूण 618 पोलिसांमध्ये 71 अधिकारी आणि 547 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 62 अधिकारी आणि 495 अशा एकूण 557 पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. दुसरीकडे नऊ अधिकारी आणि 47 पोलीस कर्मचारी असे एकूण 56 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
पोलिसांना कोरोनाचा विळखा
5 पोलिसांचा मृत्यू
दुर्दैवाने कोरोनामुळे आतापर्यंत पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईतील तीन, पुण्यातील एक आणि सोलापुरातील एका पोलिसाचा समावेश आहे.
पोलिसांवर हल्ले
संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. आतापर्यंत 190 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले आहेत. या प्रकरणात 686 हल्लेखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. कालही एक ठिकाणी पोलिसांवर हल्ला झाला. आतापर्यंतच्या हल्ल्यात 73 पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड गंभीर जखमी झाले आहेत.
98 हजार गुन्हे
लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यभरात 98 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तर 19 हजार नागरिकांना अटक करण्यात आलं आहे.
54 हजार वाहने जप्त
राज्यभरात लॉकडाऊनदरम्यान कलम 188 नुसार 98 हजार 774 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 19 हजार 82 व्यक्तींना अटक करण्यात आलं आहे. 54 हजार 148 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या :
सोलापुरात कोरोनाविरोधात लढताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर, दोन दिवसात 74 पोलीस कोरोनाग्रस्त