नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासारख्या राज्यात अद्याप कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्रालयाने 25 नोव्हेंबर रोजी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काही प्रतिबंध लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे दिशानिर्देश 1 ते 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत. (Implementation of new guidelines of Home Ministry regarding Corona from today)
केंद्रीय गृहमंत्रालयाने कोविड-19च्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हे दिशानिर्देश जारी केले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवल्या उपाययोजनांचं पालन आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सांगितलं आहे. तसंच राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश स्थानिक परिस्थितीनुसार रात्री संचारबंदीसारखे नियम लागू करु शकतात, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यांना सूचित केलं आहे.
देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून (MHA) बुधवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. तसेच राज्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावी, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
पंजाबमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांनी कडक धोरण अंवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रात्रीच्यवेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार रात्री 9.30 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. तर संचारबंदी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दुसरीकडे मास्क न वापरणाऱ्यांकडून आता 500 रुपयांऐवजी 1000 रुपये दंडाची वसूली केली जाणार आहे.
संबंधित बातम्या:
Maharashtra lockdown : 31 डिसेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय
लॉकडाऊनसाठी आता राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक; गृहमंत्रालयाची नवी नियमावली जाहीर
Implementation of new guidelines of Home Ministry regarding Corona from today