नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Corona Virus APMC Market close) आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केट आजपासून (11 एप्रिल) बंद ठेवलं जाणार आहेत. हे मार्केट अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील मार्केट यार्डही आजपासून बंद राहणार आहे. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचं वारंवार सांगूनही उल्लंघन होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचे (Corona Virus APMC Market close) लॉकडाऊन घोषित केले होते. पण जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरु राहावा यासाठी एपीएमसी मार्केट सुरु ठेवण्यात आले होते. मात्र ग्राहक आणि व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. तसेच सोशल डिस्टन्सिंग नियमांचेही तीन तेरा वाजले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह ठाण्यातील भाजी मंडई, फळबाजार ही दुकानं बंद ठेवली जाणार आहे. पुढील आदेशापर्यंत मार्केट बंद राहणार आहे.
ठाण्यातील भाजी मंडई बंद
ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे व भाजीपाला दुकाने बंद राहणार आहे. येत्या 14 एप्रिल रात्री बारापर्यंत हे सर्व बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
पुण्यातील मार्केट यार्डही बंद
पुण्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पुण्यातील मार्केट यार्डही बंद करण्यात आलं आहे. याठिकाणी भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा आणि केळी बाजार बंद करण्यात आला आहे. पुढील सूचना येईपर्यंत हे मार्केट बंद असेल असं सांगितलं जात आहे.
एपीएमसीत व्यापाऱ्याला कोरोनाची लागण
नुकतेच एपीएमसी मसाला मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बाजारात लॉकडाऊन काळातही मोठ्या प्रमाणात ग्राहक गर्दी करत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही भीती निर्माण झाली (Corona Virus APMC Market close) होती.