मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला (Corona virus India) आहे. भारतातही कोरोना व्हायरसची भीती पसरत असताना आता अनेक देवस्थानांकडून कोरोनाबद्दल जनजागृती केली जात आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असणाऱ्या राज्यातील प्रमुख मंदिरातही कोरोना व्हायरस पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय केला जात आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाचे संशयित रुग्ण (Corona virus India) आढळल्याने राज्यातील तीर्थक्षेत्रांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात भाविकांमध्ये आरोग्य विभागाच्या सहकार्यातून जनजागृती केली जात आहे.
अक्कलकोट मंदिरातील गाभाऱ्यातील वेळेत बदल
स्वामींची नगरी अशी ओळख असलेल्या अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात राज्यासह परराज्यातून रोज भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दर्शनाच्या रांगेतील गर्दी आणि संसर्ग रोखण्यासाठी अक्कलकोट मंदिर समितीच्या वतीने गाभाऱ्यातील मंदिरातील वेळ वाढवण्यात आली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून स्वच्छता ठेवली जात आहे.
त्याशिवाय मंदिरात खोकणाऱ्या भाविकांवर कर्माचाऱ्यांकडून विशेष लक्ष ठेवलं जात आहे. तसेच अनेक आरोग्य अधिकारीसुद्धा मंदिर परिसरात वेळोवेळी भेट देत आहेत.
आळंदीसह शिर्डीत दर दोन तासांनी साफ-सफाई
आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी राज्यातून हजारो भाविक आळंदीत येतात. त्यामुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने परिसरात भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची दर दोन तासांनी साफ-सफाई केली जात आहे. तर डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजकडून भाविकांना मास्क देत जनजागृती केली जात आहे.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच विदेशातील भाविकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे साईबाबा संस्थान आणि नगरपंचायत प्रशासन सज्ज झालं आहे. साई मंदिर परिसरात स्वच्छता वाढवण्यावर भर देण्यात येत आहेत. तसेच मंदिर परिसरात फिनाईलच्या ओल्या कापडाने परिसरात स्वच्छता केली जात आहे.
स्वच्छता कर्मचारी आणि दैनंदिन स्वच्छतेच्या वेळापत्रकातही वाढ करण्यात आली आहे. यासोबतच साई संस्थानच्या वतीने विशेष वैद्यकीय पथकही नेमण्यात आलं आहे. तसेच कोणी संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ तपासणीच्या सुचना संस्थानाच्या वैद्यकीय पथकाला देण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरस संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आणि व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या आहेत. सर्दी, ताप किंवा खोकला असणाऱ्या भाविकांनी साई दर्शनासाठी न येण्याचं आवाहन साई संस्थानाकडून करण्यात आलं आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मास्क अनिवार्य
कोल्हापूरच्या करवीर निवासीन अंबाबाई मंदिरात स्वच्छतेची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. देवीच्या दर्शनासाठी देश परदेशातून भाविक येत असतात. त्यामुळे दर तासाला मंदिर परिसराची स्वच्छता केली जात आहे. मंदिराच्या आवारातील प्रथमोपचार केंद्रही सज्ज आहेत.
बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. देवस्थानाने आपल्या कर्मचाऱ्यांना मास्क घालूनच कामावर येण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय मंदिरात स्वच्छता ठेवणे आणि परदेशातून आलेल्या भाविकांची माहिती तात्काळ विश्वस्त मंडळाला देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या (Corona virus India) आहेत.