मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे “यंदाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करा. ग्रेड पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी द्या,” असं पत्र उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) लिहिलं आहे. आज फेसबुक लाईव्हदरम्यान त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Uday Samant on Final Year Examination)
“मुंबई पुणे, नागपूर मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणं देखील आम्हाला शक्य नाही. तसेच जरी या परीक्षा झाल्या तरी कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि हिताच्या दृष्टीने संकट उभं राहिलं आहे.”
“त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता मनावरील ताण पाहून महाराष्ट्र शासन युजीसीकडे परवानगी मागत आहे की, आम्हाला या परीक्षा घ्यायच्या नाहीत. या परीक्षा घेत नसताना कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीची गुणांची सिस्टीम विद्यापीठाने अमलात आणावी,” असं उदय सामंत फेसबुक लाईव्ह दरम्यान म्हणाले.
या पत्राचे उत्तर आल्यास सर्व बाजूंचा विचार करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय येण्यापूर्वी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचे सदस्य, तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरु यांच्याशी चर्चा करुन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ग्रेडींग सिस्टीमचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल. (Uday Samant on Final Year Examination)
“बारावीनंतरच्या सीईटीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. तसे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. पदवीसाठी असणारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या स्तरावर होणारी परीक्षा ही तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. याबद्दल सामाजिक अंतर पाळण्यात येईल,” असेही ते म्हणाले
“विशेषतः जे विद्यार्थी आपापल्या मूळ रहिवासाच्या ठिकाणी गेले आहेत किंवा ज्यांना निवडलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहणे शक्य होणार नसेल याचा विचार करुन त्यांना निवडलेले परीक्षा केंद्र बदलण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. टाळेबंदीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाणे शक्य होणार नाही, त्यांची व्यवस्था विभागाकडून करण्यात येईल,” असेही उदय सामंत यांनी यावेळी म्हणाले. (Uday Samant on Final Year Examination)
संबंधित बातम्या :
सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा, विद्यार्थी संघटनेची मागणी
CM Uddhav Thackeray | भूमिपुत्रांनी पुढे या, आपला महाराष्ट्र आपल्या पायावर उभा करु – मुख्यमंत्री