मुंबई : जगासह अनेक राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Corona Virus Top 10 News Update) आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. अनेक देशानी लॉकडाऊनचीही घोषणा केली आहे. लॉकडाऊनदरम्यान जगात अनेक चांगल्या तसेच वाईटही गोष्टी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील देशांसह काही राज्यांमध्ये घडत असलेल्या ठळक घडामोडींचा एक आढावा (Corona Virus Top 10 News Update)
1. नेपाळमध्ये अडकलेले चीनी पर्यटक आणि नेपाळच्या पोलिसांमध्ये झडप झाली. लॉकडाऊन झाल्यापासून काही चीनी पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. त्यापैकी काहींनी पंतप्रधान निवासाबाहेर आपल्या देशात परत जाण्यासाठी फलकबाजी केली. पोलिसांनी अडवल्यानंतर शाब्दिक बाचाबाची वाढली. आणि त्यानंतर मात्र पोलिसांना मारहाण करावी लागली. काही चीनी पर्यटकांनी पोलिसांनाही मारण्याचा प्रयत्न केला. सध्या सर्वांना अटक करण्यात आली आहे. नेपाळनं 31 मे पर्यंत विमानांचं उड्डाण रोखलंय. मात्र चीन सरकारनं अडकलेल्या पर्यटकांसाठी अजून एकही विमान पाठवलेलं नाही.
2. कोरोनाचं संकट असताना हाँगकाँगच्या संसदेत मात्र लोकप्रतिनिधींनी तमाशा केला. एकमेकांवर बुट फेकून मारले आणि हाणामारीनंतर एका प्रतिनिधीला चक्क स्ट्रेचरवरुन बाहेर नेण्याची वेळ आली. चीनचं समर्थन करणारी एक खासदार एका कमिटीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानं हा वाद झाला. त्यानंतर सुरक्षारक्षकांना बोलावून गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर काढलं गेलं. मारहाण करणाऱ्या अनेकांनी मास्क घातले होते. मात्र तरी सुद्धा सगळ्यांनी एकत्र जमून गोंधळ केला.
3. कोरोनावर बनवलेल्या एका औषधाची चाचणी स्वतः वर केल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत ही धक्कादायक घटना घडली आहे. द हिंदूच्या बातमीनुसार वनऔषधी बनवणाऱ्या एका फार्मासिस्टनं कोरोनाविरोधातलं एक औषध तयार केलं होतं. औषध बनवून झाल्यानंतर त्याची चाचणी म्हणून फार्मासिस्ट आणि त्याचा सिनीयर या दोघांनी ते औषध घेतलं. मात्र काही मिनिटात दोघं चक्कर येऊन खाली पडले. फार्मासिस्टनं जास्त प्रमाणात औषध घेतलं होतं. त्यामुळे त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. तर दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. कोरोनाची लस शोधताना मृत्यू होण्याची बहुदा जगातली ही पहिली घटना आहे.
4. फेसबूक आणि गुगल सारख्या बड्या कंपन्या थेट पूर्ण वर्षभर वर्क फ्रॉम होम करण्याच्या तयारीत आहेत. सध्या फेसबूकचे बरेचसे कर्मचारी करुन काम करत आहेत. या वर्षातील फेसबूकचे सर्व महत्वाचे इव्हेंन्ट्स सुद्धा रद्द झाले आहेत. दरम्यान, 6 जुलैला फेसबुकचं कार्यालय सुरु होणार आहे. मात्र तरी ज्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची इच्छा आहे. अशांना मुभा दिली जाणार असल्याची आहे. लवकरच या संदर्भात या दोन्ही कंपन्या निर्णय घेणार आहे. जर तसं झालं तर पूर्ण वर्षभर वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेणाऱ्या या दोन्ही कंपन्या जगातील पहिल्याच कंपन्या ठरणार आहेत.
5. कोणत्याही लसीशिवाय कोरोनाचा विषाणू जगातून नष्ट होईल, असा अजब दावा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. आपल्या पक्षाच्या काही प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा दावा केला. जगात अनेक आजार आले आणि त्यांच्यावर लस सापडण्याआधी ते निघून सुद्धा गेले, असंही ट्रम्प म्हणाले मात्र कोरोना नेमका कधी जाईल, याबाबत काहीही सांगता येणार नाही. त्यामुळे लस संशोधनावर वेगानं काम सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
6. कोरोनामुळे चीनमध्ये तब्बल 8 कोटी लोकांचा रोजगार केल्याचा दावा एका रिपोर्टमधून समोर आला आहे. सलगच्या चौथ्या महिन्यात चीनमधल्या बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चीनमधले कोणतेच आकडे अधिकृतपणे बाहेर येत नाहीत. मात्र बेरोजगारीच्या दरावरुन काही तज्ज्ञांनी चीनमध्येही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्याचं म्हटलं आहे. चीनमधले जवळपास 29 कोटी लोक हे कन्स्ट्रक्शन, मॅन्युफ्क्च्यूरिंग क्षेत्रात काम करणारे आहेत. या सगळ्या क्षेत्रात मार्च अखेरपर्यंत 8 कोटी लोकांचा रोजगार गेल्याचा दावा केला जात आहे.
7. अमेरिकेत आता घरच्या घरी सुद्धा टेस्ट करणं शक्य होणार आहे. आतापर्यंत कोरोना चाचणीत नाक आणि घशाचे नमुने घेतले जात होते. मात्र त्या पद्धतीत काही चूक झाली तर तपासणी करणाऱ्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो. त्यामुळे आता अमेरिकेतल्या काही भागात घरच्या घरी लाळेचा नमुना घेऊन त्यानंतर ते तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. लाळेमार्फत कोरोना टेस्टला अमेरिकेनं परवानगी दिली आहे. यातून आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होऊन कोरोनाच्या चाचणीचं प्रमाणही वाढणार आहे. एका बातमीनुसार मेक इन इंडियाअंतर्गत भारतातही घरच्या घरी टेस्ट बनवण्याचं किट तयार करण्यात आलं आहे. त्या किटला मान्यता मिळाली तर कोरोना चाचणीची खर्च अत्यंत कमी होणार आहे.
8. पाकिस्तानातले वादग्रस्त मौलवी मुफ्ती अब्दुल क्वयावींनी पुन्हा एक अजब दावा केला आहे. ज्या दारुमध्ये अल्कोहोलचं प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे, ती दारु हलाल म्हणजे पिण्यायोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर तंबाखू आणि पान हलाल असेल., तर मग आधुनिक काळातली दारु सुद्धा हलाल आहे, असं सुद्धा त्यांनी पुढे म्हटलं. पाकिस्तानात एका टिव्हीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
9. लंडनमध्य़े डॉक्टर आणि नर्सेसमध्ये राखीव ठेवलेले पीपीई किट आणि मास्क चोरीला जाण्याची घटना घडली आहे. मेट्रोच्या बातमीनुसार ट्राफलगर बिझनेस पार्कात ही घटना घडली. रात्रीच्या वेळेस चोरांनी शटर कापून पीपीईचे सेट आणि मास्क पळवून नेले. तिथं तब्बल 80 हजारांपेक्षा जास्त मास्क ठेवण्यात आले होते. चोरी गेलेल्या सर्व मालाची तपासणी केल्यानंतर चोरांनी दीड लाख युरोचा माल चोरल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार तब्बल 1 कोटी 36 लाख रुपयांचा सामान चोरीला गेलं आहे.
10. महाराष्ट्राच्या नांदेडमधून परतलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर पंजाबमधील मृतांचा आकडा 30 झाला आहे. महत्वाचं म्हणजे पंजाबात जितके कोरोनाचे रुग्ण आहेत, त्यापैकी बहुतांश जण हे नांदेडच्या गुरुद्वारावरुन पंजाबात परतले आहेत. आतापर्यंत पंजाबात एकूण 1764 जण कोरोनांची लागण झाली आहे.
(Corona Virus Top 10 News Update)
संबंधित बातम्या :
कोरोनाचा दणका, हजार कंपन्या चीन सोडणार?
जगात काय घडतंय? : अमेरिकेत भारतीय डॉक्टर्स, नर्सेसना कायमस्वरुपी नागरिकत्व मिळण्याची चिन्हं