लातूर : चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरलेल्या अफवांचा फटका चिकन बाजाराला बसला आहे. कोंबड्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती पसरल्यामुळे राज्यभरात अनेकांनी चिकनला ‘बायबाय’ केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या 60 टक्के मांसाहारप्रेमींनी चिकन खाणं बंद केल्यामुळे दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या चिकन बाजाराला कोट्यवधींचा फटका (Coronavirus affects Poultry Business) बसत आहे.
चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते, अशी चुकीची माहिती सोशल मीडियातून पसरली आणि व्हायरसच्या भीतीने मांसाहारींनी अचानक चिकन खायचे बंद केले. लातूर जिल्ह्यात दररोज 30 ते 35 टन चिकनची मागणी असायची. लातूर शहरातल्या हॉटेल व्यावसायिकांची दररोज 10 ते 12 टन चिकनची मागणी व्हायची, मात्र सध्या हेच प्रमाण 60 टक्क्यांनी घसरलं आहे.
चिकनची मागणी घटल्याने चिकन विक्रेते तर अडचणीत आले आहेतच, मात्र पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांवरही संकट ओढावलं आहे. पोल्ट्री फार्ममधून जे चिकन 40 ते 70 रुपये किलोने खरेदी केलं जायचं, त्याचा दर घसरुन आता 28 रुपये प्रति किलोवर आला आहे.
कोंबडीची छोटी पिल्लं अगोदर 20 ते 25 रुपये दराने विकली जायची, आता ती दहा ते बारा रुपयांवर आली आहेत. त्यामुळे पोल्ट्रीफार्म मालक अडचणीत आले आहेत.
आपल्याकडे चिकन ज्या पद्धतीने शिजवले जाते, त्यानुसार त्यात कोणतेही विषाणू जिवंत राहण्याची शक्यता नाही. याशिवाय कोंबडी किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कोरोना व्हायरस असल्याची भारतात चिन्हं नाहीत. त्यामुळे चिकन खाणाऱ्यांनी मनामध्ये अजिबात शंका बाळगू नये, असं आवाहन लातूरमधील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नानासाहेब कदम यांनी केलं आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी पोल्ट्री फार्म सुरु केले आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीने हा जोडधंदा उद्ध्वस्त होण्याकडे वाटचाल करत आहे. ही अवस्था एकट्या लातूरची नाही तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात हा अफवेचा व्हायरस झपाट्याने पसरतो आहे. मांसाहारींनी अशा अफवांना बळी न पडता चिकन खात राहावं, असं आवाहन (Coronavirus affects Poultry Business) केलं जात आहे.