नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जगातील कोट्यावधी लोक कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार यावर लक्ष ठेवून आहेत. प्रसिद्ध जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. या लसीने चाचणीतील पहिले दोन टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत. (Johnson and Johnson Covid-19 Vaccine Third Phase in clinical trial)
आता कोरोनावरील या लसीचा प्रयोग हा 60 हजार जणांवर केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी अमेरिकेसह जगातील 200 हून अधिक जागांची निवड करण्यात आली असून या ठिकाणचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ची कोरोना लस तिसऱ्या टप्प्यात पोहोचणारी अमेरिकेची चौथी लस ठरली आहे. तर जगभरातील दहावी कंपनी आहे. ही कंपनी NOT FOR PROFIT या तत्त्वावर ही लस तयार करत आहे. जर या चाचणीचे टप्पे पुढे भविष्यातही अशाचप्रकारे यशस्वी ठरले तर येत्या 2021 पर्यंत या लसीला परवानगी मिळू शकते असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ अॅलेक्स गोर्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आमची कंपनी जागतिक स्तरावर वैज्ञानिक नाविन्यांचा आधार घेत या आजारापासून मुक्त होण्यासाठी ही लस तयार करत आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून सर्व देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. सद्यस्थितीत जवळपास चार लसी या तिसऱ्या टप्प्यात आहेत, अशी माहिती NIH च्या राष्ट्रीय अॅलर्जी आणि संक्रमित रोगांचे निदेशक अँथनी यांनी दिली.
अमेरिकेकडून ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ला ‘Operation Warp Speed’ अंतर्गत 1.45 बिलीयन डॉलरचे फंडींगही दिले आहे. जॉन्सन अॅन्ड जॉन्सनची लस सर्दी-खोकल्यावर आधारित एडेनोवायरलच्या सिंगल डोसवर आधारित आहे. यामध्ये नव्या कोरोना व्हायरसच्या ‘स्पाईक प्रोटीन’चाही समावेश करण्यात आला. याचा एक डोस दिल्याने इम्युनिटी विकसित होऊ शकते, असा दावा केला जात आहे. (Johnson and Johnson Covid-19 Vaccine Third Phase in clinical trial)
संबंधित बातम्या :
अमेरिकेत 1 नोव्हेंबरपासून कोरोना लस वाटपासाठी तयारी करा, ट्रम्प सरकारचे राज्यांना सूचना
US Election | कोरोनाच्या लसीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य अवलंबून?