रायगड : मुंबईतील सोमय्या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या महिलेने आपल्या पतीसह रायगडमधील आपल्या गावी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे ही बाब निदर्शनास आली. (Covid Positive Patient Escaped From Mumbai)
सोमय्या रुग्णालयात उपचार सुरु असताना तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हीच संधी साधून ही महिला तिथून बाहेर पडली. त्यानंतर नवऱ्यासोबत तिने रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या करमर गाव गाठलं. या महिलेचे वय 35 वर्षे असून ती गर्भवती आहे. तिच्याकडची कागदपत्र तपासली असता ती कोविड पॉझिटिव्ह असल्याची बाब आरोग्य यंत्रणेच्या लक्षात आली.
त्यानंतर आता या दाम्पत्याला महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घेतला असून त्यांच्यविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिले आहेत.
रायगड जिल्ह्यात 25 नवे कोरोनाग्रस्त
रायगड जिल्ह्यात आढळलेल्या एकूण 571 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 201 जण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 349 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
काल (19 मे) दिवसभरात 25 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील 18, पनवेल ग्रामीणमधील 2, उरणमधील 2, पेणमधील 3 रुग्णांचा समावेश आहे.
दिलासा देणारी बाब म्हणजे, दिवसभरात 20 रुग्णांनी कोरोना मात दिली असून, ते पूर्णपणे बरे झाले आहेत. यामध्ये पनवेल मनपा क्षेत्रातील 7, पनवेल ग्रामीणमधील 8, उरणमधील 4, पेणमधील 1 रुग्णाचा समावेश आहे. तर अलिबागमधील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Covid Positive Patient Escaped From Mumbai)
संबंधित बातम्या :
रायगड जिल्ह्यात 25 नवे कोरोनाग्रस्त, अलिबागमधील रुग्णाचा मृत्यू
मालेगावात 24 तासात 42 नवे कोरोनाग्रस्त, एकाच कुटुंबातील 8 जणांना लागण