लंडन: कोरोनाच्या विषाणूवर (Coronavirus) प्रभावी ठरु शकणारी अॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्डची बहुचर्चित लस (Covid-19 vaccine)आता अंतिम टप्प्यात आहे. आता या लशीला केवळ परवानगी मिळायची बाकी आहे. ताज्या माहितीनुसार ही लस कोरोनाच्या रुग्णांवर 90 टक्के प्रभावी ठरू शकते. मात्र, हा शोध लागण्यामागची एक रंजक गोष्ट नुकतीच समोर आली आहे. (Covid vaccine Dosing error turns into lucky punch)
ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या कोरोनापासून संरक्षणासाठी या लशीचा दीड (एक+अर्धा) डोस देणे गरजेचे आहे. ब्रिटनमध्ये एप्रिल महिन्यात ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेन्का यांनी एकत्र येत या लशीच्या संशोधनाला सुरुवात केली होती. सुरुवातीला लशीच्या चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना नियोजनाप्रमाणे लशीचे दोन पूर्ण डोस देण्यात आले होते.
तेव्हा ही लस 70 टक्के प्रभावी ठरली होती. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांमध्ये थकवा, डोकेदुखी आणि हातदुखी अशी लक्षणे दिसायला लागली. लस दिल्यानंतर शास्त्रज्ञांना हे परिणाम अपेक्षित होते. मात्र, ही लक्षणे अपेक्षेपेक्षा सौम्य होती.
तेव्हा शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा मागे जाऊन सगळे तपशील तपासले. त्यावेळी आपण लशीची परिणामकारकता जोखण्यात थोडेसे चुकल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. लशीची दीड मात्रा गरजेची असताना आपण दोन पूर्ण मात्र दिल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे नंतर कंपनीकडून कोरोना लशीची दीड मात्रा (Dose) निश्चित करण्यात आल्याची माहिती अॅस्ट्राझेन्काचे शास्त्रज्ञ मेने पेंगालोस यांच्याकडून देण्यात आली.
‘कोव्हिशिल्ड’ ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत व्हायला सुरुवात होईल. या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे तणावाखाली असलेल्या भारतीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सिरम इन्स्टिट्यूटकडून पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडे ‘कोव्हिशिल्ड’च्या तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्याला प्राधान्य असेल. तर सामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. तर या लशीच्या एका डोसची किंमत 500 ते 600 रुपये असेल. केंद्र सरकार या लशीची मोठ्याप्रमाणावर खरेदी करणार आहे. त्यामुळे सरकारला ही लस 225 ते 300 रुपयांना मिळू शकेल.
संबंधित बातम्या:
भारतात कसा असणार कोरोना लस वितरणाचा प्लॅन, केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात….