देशात आपत्कालीन वापरासाठी कोणत्या लसीला केंद्राकडून मंजुरी मिळणार?

| Updated on: Dec 27, 2020 | 8:36 AM

कोरोनावरील लस कधी येणार याकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे.

देशात आपत्कालीन वापरासाठी कोणत्या लसीला केंद्राकडून मंजुरी मिळणार?
Follow us on

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही देशांमधील नियंत्रणात आलेली कोरोनाची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ लागली आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांचे लक्ष कोरोनावरील लस कधी येणार याकडे लागले आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. भारतात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीला मंजुरी मिळू शकते. (Covishield may become the first Vaccine to gain emergency approval in India)

कंपनीद्वारे काही आकडेवारी मांडण्यात आली आहे. त्यावरुन हा लसीच्या वापराला सरकारकडून लवकरच मंजुरी दिली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. भारताचं लक्ष सध्या ब्रिटनकडे आहे. कारण ब्रिटनने या लसीच्या आपत्कालीन वापराला अद्याप मंजुरी दिलेली नाही. ब्रिटनमध्ये या लसीच्या वापराला मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही त्यदृष्टीने पावलं उचलली जाऊ शकतात.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूके ड्रग रेग्युलेटरने ऑक्सफोर्डच्या लसीला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (Central Drugs Standard Control Organisation) COVID-19 विशेषज्ञ समितीची बैठक आयोजित करेल. या बैठकीत लसीला मंजुरी देण्यापूर्वी भारतात करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलमधील सुरक्षा आणि इम्यूनोजेनिसिटी डेटाचा सखोल आढावा घेतला जाईल.

कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्यास वेळ लागणार

भारत बायोटेकची कोविड-19 वरील लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्यास वेळ लागणार आहे. कारण या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण अद्याप सुरु आहे. तर फायझर कंपनीचं केवळ एक प्रेझेंटेशन देणं बाकी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्डची लस कोविशिल्ड ही भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळवणारी पहिली लस ठरू शकते.

ऑक्सफोर्डची लस स्वस्त

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी उत्पन्न असणार्‍या देशांसाठी आणि गरम हवामानातील नागरिकांसाठी अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड लस महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण ती लस स्वस्तही आहे. सोबतच लसीचे वाहतुकीकरण करणं सोपं आहे आणि सामान्य फ्रिज तापमानात दीर्घकाळ साठवलीही जाऊ शकते. त्यामुळे या लसीचा भारतीयांना फायदा होईल अशीही माहिती समोर येत आहे.

जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले होते की, जानेवारी (2021) महिन्यात देशातील नागरिकांना कोव्हिड-19 वरील प्रभावी लस दिली जाऊ शकते. लसीची सुरक्षा आणि परिणामकारकतेला (प्रभावशीलता) आम्ही प्राधान्य देणार आहोत. याबाबत आम्हाला कोणतीही तडजोड करायची नाही. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, जानेवारी महिन्याच्या कोणत्याही आठवड्यात आपण भारतीय नागरिकांना पहिली कोरोना लस देण्याच्या स्थितीत येऊ शकतो.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Minister of Health Harsh Vardhan) यांनी गेल्या रविवारी कोरोनावरील लसीबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात देशातील नागरिकांना कोव्हिड-19 वरील प्रभावी लस दिली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले होते. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

सुरुवातीला 30 कोटी नागरिकांचे लसीकरण

देशात सुरुवातीला 30 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. या 30 कोटी नागरिकांपैकी सर्वात आधी कोणाला लस दिली जाणार याबाबत आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सुरुवातीला एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावरील प्रभावी लस दिली जाईल. त्यानंतर दोन कोटी frontline workers ना कोरोनावरील लस दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले 26 कोटी नागरिक आणि 50 वर्षांखालील एक कोटी नागरिक ज्यांना काही आजार आहेत, अशा एकूण 30 कोटी नागरिकांना पहिल्या टप्प्यात कोरोनावरील लस दिली जाईल.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) सध्या भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि फायजर या कंपन्यांनी केलेल्या विनंती अर्जांची तपासणी करत आहे. जेणेकरुन या कंपन्यांच्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देता येईल. गेल्या आठवड्यात असे सांगण्यात आले होते की, DGCI ने या कंपन्यांकडून लसीबाबतचा अधिक डेटा मागितला आहे, ते खरे असले तरी त्याचा लस मिळण्याच्या वेळेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या –

New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर

भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?

(Covishield may become the first Vaccine to gain emergency approval in India)