यवतमाळ : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांवर आरोपीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे घडली. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिवरी येथील ही घटना आहे. यात पोलीस काँस्टेबल राजू कूडमेथे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पोलीस काँस्टेबल प्रमोद कूमरे आणि प्रमोद फूफटे गंभीर जखमी झालेत. या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली.
आरोपी अनील मेश्राम याला अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यासाठी रविवारी रात्री एकच्या सुमारास पोलीस काँस्टेबल राजू कूडमेथे, प्रमोद कूमरे आणि प्रमोद फूफटे गेले होते. अचानक आरोपी अनील मेश्रामने पोलिसांवर काठीने हल्ला केला. यात पोलीस काँस्टेबल राजू कूडमेथे यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांवर मारेगांव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थीर आहे.
मारेगांव पोलिस स्टेशनमध्ये अनिल मेश्राम याच्यावर कलम 324, 452 अंतर्गत गुन्हा दाखल होता. न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आरोपी न्यायालयात कधीही हजर झाला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने आरोपीवर अटक वॉरंट बजावला. तो बजावण्यासाठी हे पोलिस गेले होते. जिथे त्याने पोलिसांवरच हल्ला चढवला. यापूर्वीही त्याने पोलिसांवर हल्ला केला होता.
एका पोलिसाची हत्या आणि इतर दोन पोलिसांना जखमी करणारा आरोपी अनिल मेश्राम सध्या फरार असून, यवतमाळ पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे.