वर्धा: सध्या सर्व बँकानी जुने एटीएम कार्ड बदलून चीप बेस एटीएम कार्ड बंधनकारक केले आहे. याचाच फायदा काही भामटे घेत आहेत. बँक कर्मचारी असल्याची बतावणी करत, खात्याची फोनवर माहिती मिळवून डल्ला मारत आहेत. खातेदाराची माहिती मिळताच खात्यातील रक्कम काही सेकंदातच लंपास करत आहेत. 31 डिसेंबरपर्यंत चीप बेस एटीएम कार्ड बदलविण्यासाठी शेवटची मुदत आहे.यातच बँकांचा संप आणि सुट्यांमुळे ऑनलाईन चोरटे फायदा घेत आहेत. त्यामुळे सायबर क्राईम विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
आजच्या काळात कोण कुणाची कशी फसवणूक करेल काहीच सांगता येत नाही. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्याचा सपाटा सध्या ऑनलाईन चोरांनी लावला आहे. अशाच प्रकारच्या घटना घडू नये यासाठी खबरदारी हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सध्या सर्वच बँकांनी एटीएम कार्ड बंद करून नवीन एटीम कार्ड देण्याचे जाहीर केले आहे. काहींना ते प्राप्त देखील होत आहे . बँकांचा असणारा संप आणि एटीम कार्डमधील बदल या घोषणांचा फायदा घेत ऑनलाईन हेरगिरी करणाऱ्या चोरांकडून, कुणाच्याही मोबाईलची मेसेज रिंग वाजू शकते.
आपले कार्ड बदलण्यासाठी आपला एटीम पिन सांगा, कार्ड नंबर सांगा अशी विचारणाही होऊ शकते. याशिवाय अमक्या खात्यात अमकी रक्कम भरा असे भावूक आवाहनही केले जाऊ शकते. त्यामुळे सावधान. बँकांचा संप आणि त्यातही मधल्या सुट्या यामुळे असा कॉल बँका करूच शकणार नाही हे लक्षात घ्या. वेळीच खबरदारी घेत फसवणुकीपासून बचाव करा. सायबर क्राईम विभाग तुमच्या सोबतीला आहेच, त्वरित तक्रार नोंदवून फसवणूक करणाऱ्याचे पितळ उघडे पाडले जाऊ शकते. सायबर क्राईमच्या वर्धा शाखेने खबरदारीसाठी तसे आवाहन केले आहे.
मॅग्नेटिक चीफचे एटीएम सध्या सुरु होणार आहे.ग्राहकांनी या सर्वांबाबत बँकेत येऊन शहानिशा करावी. सायबर फ्रॉड करणारे लोक ग्राहकांकडून मोबाईलवर डेबिट कार्ड, आधार नंबर घेऊन ते क्लोनिंग करतात आणि त्याचा ओटीपी ते स्वत: जनरेट करतात आणि आपली फसवणूक करतात. ग्राहकांनी मोबाईल नंबर वरुन आलेल्या कॉलला प्रतिसाद देऊ नये, बँक फक्त लँडलाईन नंबरवरून संपर्क करीत असल्याची माहिती वर्धा स्टेट बँकेचे उपशाखा प्रबंधक उल्हास गावंडे यांनी दिलीय.