जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील शिंदी इथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात साडेतीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. देवयानी दिनेश चोंडके असं मृत्यू झालेल्या बालिकेचं नाव आहे. गावात झुंडीने फिरत असलेल्या कुत्र्यांमुळे सर्व गाव सध्या दहशतीच्या सावटाखाली असल्याची माहिती ग्रामस्थांनी टीव्ही 9ला दिली.
गावातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवत तिच्या शरीराचे लचके तोडून तिला ठार केलं. जखमी अवस्थेत बालिकेला चाळीसगाव येथील रुग्णालयात आणले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं. कुत्र्यांच्या हल्ल्यात साडे तीन वर्षाची बालिका दगावल्याने गावातील लहान मुलं सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
घराजवळ असलेल्या शेतात शौचालयासाठी देवयानी गेली होती. त्यावेळी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने तिच्यावर हल्ला केला. हा प्रकार शेजारच्या महिलेला पाहिला आणि एकच आरडाओरड करत शेजाऱ्यांना हाक दिली. मग जमलेल्या लोकांनी दगड, काठी घेऊन कुत्र्यांच्या ताब्यातून देवयानीला सोडवलं. मात्र तोपर्यंत कुत्र्यांनी तिच्या शरिराचे अनेक लचके तोडले होते. ग्रामस्थांच्या मदतीने तिला चाळीसगाव येथील डॉक्टर देवरे आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत देवयानीचा मृत्यू झाला झाला होता. या घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थांनी पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली.
घडलेला प्रकार अतिशय दुःखद असून, संपूर्ण गावच भटक्या कुत्र्यांच्या दहशती खाली आहे. गावाशेजारी मोठा पोल्ट्रीफार्म आहे. तिथे मेलेल्या कोंबड्या खाण्यासाठी या परिसरात भटकी कुत्री मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. रात्री अपरात्री मुलं बाहेर फिरु शकत नाहीत. शिवाय महिलांच्या देखील अडचणी वाढल्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.