शिर्डी : संगमनेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका साडे तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात असलेल्या भोरमळा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकीकडे शोककळा पसरलीय तर दुसरीकडे बिबटयाच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. प्राजक्ता तेजस मधे असं या चिमकुलीचं नाव आहे.
भोरमळा याठिकाणी प्रताप भोर यांच्याकडे तेजस मधे हे वाट्याने शेती करत होते. रविवारी संध्याकाळी मधे हे टोमॅटोच्या शेतीत काम करत होते. त्याचवेळी त्यांच्या तीन मुली त्याठिकाणी खेळत होत्या अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या प्राजक्ताला ऊसाच्या शेतात ओढत नेले. त्यावेळी मधे आणि त्यांच्या पत्नीने जोरजोराने आरडा ओरड केली आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बघता बघता दोनशे ते तीनशे नागरिकांनी ऊसाच्या शेताला गराडा घातला अंधार असल्याने मोटारसायकली चालू करून, बॅट-या हातात घेऊन चिमुकलीचा शोध घेण्यात आला. फटाकेही वाजवण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस कॉन्सटेबल विशाल कर्पे, किशोर लाड, संतोष फड आदि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरीही बिबट्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. शेवटी पोलीसही ऊसाच्या शेतात घुसले. त्याच दरम्यान पोलीस कॉन्सटेबल विशाल कर्पे यांनी चिमुकल्या प्राजक्ताला ऊसाच्या शेतातून बाहेर काढले. त्यानंतर एका खाजगी गाडीतून जखमी अवस्थेत प्राजक्ताला आळेफाटा येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्या अगोदरच प्राजक्ताची प्राणज्योत मावळली होती.
चार ते पाच दिवसांपुर्वीही बिबट्याने भोरमळा याठिकाणी धुमाकूळ घालत कुत्रे, शेळ्या, वासरांवर हल्ला केला होता. आई-वडीलांनी आणि दोन बहीणीं समोर चिमुकल्या प्राजक्ताला बिबट्याने ऊसाच्या शेतात ओढून नेले. त्यामुळे तीच्या आई वडीलांनी एकच टाहो फोडला. घटनेची माहिती समजताच बऱ्याच वेळाने वनविभागाचे दिलीप बहीरट, तान्हाजी फाफाळे हे घटनास्थळी आले. रात्री ऊसाच्या शेताजवळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. हा बिबट्या नरभक्षक बनल्याने परिसरात भितीचं सावट पसरलं असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
व्हिडीओ : ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये शिरला बिबट्या, दृश्य CCTV त कैद