काही जण गेल्यानंतरही अनेकांना जीवनदान देऊन जात असतात.तसाच प्रकार एका लेडी ट्रेनी पायलटबाबत घडला आहे. राजस्थानच्या जैसलमेर पोखरणच्या खेतोलाई गावात राहणाऱ्या २१ वर्षांच्या प्रशिक्षणार्थी पायलट चेष्टा बिश्नोई हीचा ९ डिसेंबर रोजी पुणे येथे अपघाती मृत्यू झाला होता. एक वर्षांपूर्वी पायलट प्रशिक्षणासाठी पुण्यात आली होती. चेष्टाचा अपघात गंभीर जखमी झाल्याने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले होते. तिथे गेले अनेक दिवस ती कोमात होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली.तिच्या पालकांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांना नवे जीवन मिळणार आहे.
चेष्टा बिष्णोई राजस्थानच्या अणू चाचण्यामुळे प्रसिद्ध असलेल्या पोखरण येथील खेतोलाई गावातील रहिवासी होती. पुण्यात ती पायलटचे प्रशिक्षण घेत होती. तिला विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन एक वर्षे होत आले होते. चेष्टा हीने २०० तासांच्या फ्लाईंग ट्रेनिंगमधील ६८ तासांचे पायलट प्रशिक्षण पूर्ण केले होते. तिचे दोन वर्षांचे पायलट प्रशिक्षण शिल्लक होते. ९ डिसेंबर रोजी चेष्टा आपल्या पायलट प्रशिक्षणासाठी जात असताना तिची कार एका झाडाला धडकली. चेष्टा आपल्या तीन मित्रांसह प्रवास करीत असताना हा भीषण अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर रुपी जखमी झालेल्या चेष्टा हि अपघातानंतर कोमात गेली होती.
चेष्टा हिच्यावर नऊ दिवस उपचार चालले होते. मंगळवारी अखेर उपचारादरम्यान चेष्टा हिचा मृत्यू झाला. चेष्टा हिच्या मृत्यूनंतर तिचे आई-वडील आणि भावाने तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. चेष्टा हिचे हृदय, यकृत, दोन्ही किडनी, स्वादुपिंड असे अवयव दान करण्यात येणार आहेत. त्यामुळे ५ लोकांना नवे जीवन मिळणार आहे.
चेष्टा हिच्या मृतदेहावर बुधवारी तिच्या गावी खेतोलाई येथे कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मोठ्या संख्येने गावकरी आणि लोकप्रतिनिधी जमले होते. चेष्टा बिष्णोई अंगदान करुन मृत्यूनंतरही अमर झाली असून तिच्यामुळे अनेकांना जीवनदान मिळणार आहे.