मेघना गुलजार हे बॉलिवूडमधलं दिग्दर्शक म्हणून महत्त्वाचं (CHHAPAAK MOVIE REVIEW) नाव. मेघनानं आपल्या प्रत्येक सिनेमात संवेदनशील विषय सचोटीनं हाताळले आहेत. ‘तलवार’ आणि ‘राझी’ या सिनेमात तिच्यातील संवेदनशील दिग्दर्शिका सगळ्यांना दिसली. त्यामुळेच तिच्या ‘छपाक’ या सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. बरं सोबतीला दीपिका पदूकोनही होतीच, मात्र हा सिनेमा अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही. या सिनेमात आपल्याला घटना दिसली, पण वेदना पोहोचल्या नाहीत. एसिड अटॅक ग्रस्त मुलीच्या वेदना, तिला होणारा शारिरिक, मानसिक त्रास दाखवण्यात मेघना कमी पडली. एकूणच सिनेमाची मांडणी जर बघितली तर ती विखुरलेली (CHHAPAAK MOVIE REVIEW) वाटते. एकाच रुळावर या सिनेमाची गाडी चालवली आणि पीडितेच्या वेदना रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचवण्यात मेघना यशस्वी ठरली असती तर नक्कीच या सिनेमानं वेगळी उंची गाठली असती.
सिनेमा हा समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतो. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर अशा अनेक सिनेमांची उदाहरण देता येतील. हा सिनेमा म्हणजे समाजातील विकृत मनोवृत्तीला सनकन मारलेली ‘छपाक’ आहे. या सिनेमाचं दोन वैशिष्ट्य म्हणता येतील एक म्हणजे सिनेमातील दीपिकाचा तसेच इतर अॅसिड अटॅकग्रस्त दाखवलेल्या महिलांचा मेकअक आणि दुसरं म्हणजे सिनेमाला ठेवलेला रिअलिस्टीक टच. 15 वर्षाच्या लक्ष्मी अग्रवालवर 2005 साली तिच्याच परिचयाच्या 32 वर्षीय नईम खाननं अॅसिड अटॅक करतो. या हल्ल्यातून लक्ष्मी सावरत ती जिद्दीनं उभी राहिली आणि लढली. दोषींना शिक्षा होण्यासाठी झटली. एवढचं नाही तर अॅसिड बंदी व्हावी यासाठीही तिनं आवाज उठवला. अशा या लक्ष्मी अग्रवालचा प्रेरणादायी मन हेलावून टाकणारा प्रवास ‘छपाक’मधून दाखवण्यात आला आहे. आता सिनेमा जरी सत्य घटनेवर आधारीत असला तरी सिनेमात कलाकारांची नावं मात्र बदलण्यात आली आहेत.
सिनेमात लक्ष्मीची मालती झालीय आहे. तर नईम खानचा बशीर खान. खऱ्या आयुष्यात हा भयानक हल्ला होतो तेव्हा लक्ष्मीचं वय असतं 15 वर्ष. तर सिनेमात मालतीचं वय दाखवलंय 19 वर्ष. असे काही छोटे बदल सोडले तर समाजातील विकृतीचा बुरखा मेघनानं आपल्या सिनेमात फाडला आहे. गायिका बनण्याची स्वप्न बघणाऱ्या, जिला जग जिंकायचं असतं, जिची स्वप्न खूप मोठी असतात अशा लक्ष्मीवर अॅसिड हल्ला करणारा नईम हाच फक्त विकृत नव्हता, तर पदोपदी लक्ष्मीला तिचा चेहरा कुरुप असल्याची जाणीव करुन देणारे सोकॉल्ड ‘व्हाईट कॉलर’ ही विकृतच होते.
लक्ष्मीवर जेव्हा हा हल्ला होतो तेव्हा एकही मदतीला न आलेला माणूस ही सुध्दा या पांढरपोशा समाजाची विकृतीच म्हणावी लागेल. याच वर्मावर मेघनानं बोट ठेवलं आहे. पण या सगळ्याचा अचूक परिणाम साधण्यात तिला यश मिळालेलं नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध थोडा स्लो आहे. त्यामुळे तुमची चुळबुळ वाढेल. चित्रपटाच्या उत्तरार्धात मात्र अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. लक्ष्मी अर्थात मालती (सिनेमातील नाव) च्या आयुष्यातील चढ-उतार, 15व्या वर्षीच झालेल्या या हलल्यातून ती कशी सावरली, समाजाला ती कशी सामोरं गेली, एका मुलीवर जेव्हा अशा प्रकारचा भ्याड हल्ला होतो तेव्हा हा आघात ती कसा पचवते या सगळ्या गोष्टी सिनेमात बघायला मिळतील ही अपेक्षा होती. पण कुठेतरी हे सगळं पटरन मेघनानं आटोपतं घेतलं आहे.
उत्तरार्धामध्ये लक्ष्मीच्या जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला जातो. देशात अनेक महिला अॅसिड हल्ल्याच्या शिकार होतात. मात्र अजूनही अॅसिडच्या विक्रीवर बंदी नाही. ते बाजारात सहज उपलब्ध आहे. परंतु कवडीमोलाची किंमत असलेल्या अॅसिडचे परिणाम किती घातक आहेत हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. अॅसिड हल्ला झाल्यावर पीडितेवर तर शारिरिक-मानसिक आघात होतो, शिवाय तिच्या कुटुंबालाही बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं, हे विदारक वास्तव मेघनानं या सिनेमातं दाखलयं.
सिनेमात एका दृश्यात मालती तिच्या आईला म्हणते ‘नाक नही है, कान नही है, झुमके कहा लगाऊंगी’ तेव्हा खरंच मन हेलावून जातं. ‘उन्होने मेरी सुरत बदली है, मेरा मन नही, कितना अच्छा होता अगर अॅसिड बिकता ही नही, बिकता ही नही तो फेकता ही नही’, सारखे संवाद अचूक परिणाम साधतात. दीपिका खऱ्या अर्थानं सिनेमाची जान आहे. बऱ्याच प्रसंगात तर दीपिका हुबेहुब लक्ष्मी अग्रवाल वाटते. अॅसिड अटॅक झाल्यावर तसेच आपला चेहरा आरशात बघितल्यावर दीपिका अर्थात मालती ज्या जीवाच्या आकांतानं ओरडते ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.
दीपिकाचं या सिनेमाचा नायक आहे. एक अभिनेत्री म्हणून हा सिनेमा दीपिकाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे. अॅसिड हल्लाग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा, एनजीओ चालवणाऱ्या तरुण अमोलची भूमिका विक्रांत मेसीनं उत्तम रंगवली आहे. त्याला सिनेमात अजून वाव मिळायला हवा होता असं राहुन राहुन वाटतं. मालतीच्या वकील अर्चनाच्या भूमिकेत मधुरजीत सरघीनंही उत्तम काम केलं आहे. लक्ष्मी अर्थात मालतीला न्याय मिळवून देण्यात यांचा महत्त्वाचा वाटा होता. बशीर शेखच्या भूमिकेत विशाल दहियानं भन्नाट काम केलं आहे. बऱ्याच प्रसंगात तो फक्त नजरेतून व्यक्त झालाय. इतर कलाकारांनीही सिनेमात चांगली काम केलीयेत.
शंकर-एहसान-रॉयचं संगीत उत्तम झालं आहे. विशेषत: गुलजार साहेबांनी लिहिलेलं आणि अरजित सिंगने गायलेलं ‘छपाक से’ गाणं उत्तम जमलं आहे. एकूणच काय तर या सिनेमाचं सादरीकरण, मांडणी मेघना गुलजारनं अजून चांगली केली असती तर हा सिनेमा नक्कीच अजून प्रभावशाली झाला असता. ‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स.