अकोला : बँकांचा संप असला की अनेकजण पुढील आर्थिक व्यवहारासाठी आधीच पैसे काढून ठेवण्याला प्राधान्य देतात. अशावेळी एटीएममध्येही पैसे नसतील तर ग्राहकांची मोठी अडचण होते. मात्र, महत्त्वाचे व्यवहार करताना एटीएममधून खराब नोटा बाहेर आल्या तर संबंधित ग्राहकांना मोठ्या मनस्तापालाही सामोरं जावं लागतं (Defective currency from SBI ATM). असाच प्रकार अकोला शहरात घडला आहे. त्यामुळे तेथील आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं.
मोहम्मद जावेद यांनी वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची म्हणून रात्री साडेआठच्या सुमारास अकोला जिल्हापरिषदेच्या गेटजवळील एसबीआय एटीएममधून 10 हजार रुपये काढले. त्यावेळी एटीएममधून केवळ 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपातच 10 हजार रुपये मिळाले. ते हे पैसे घेऊन वर्तमानपत्राच्या कार्यालयात घेऊन गेले, मात्र त्याठिकाणी नोटांवर काळ्या रंगाच्या रेषा दिसून आल्याने पैसे घेण्यास नकार देण्यात आला. ऐनवेळी झालेल्या या घटनाक्रमाने जावेद यांची आर्थिक अडचण झाली आणि त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
जावेद यांनी काढलेल्या 10 हजार रुपयांच्या सर्व नोटांवर काळ्या रंगाच्या बारीक रेषा आहेत. काही नोटांवर मोठ्या प्रमाणात रेषा आहेत. काही नोटांवर सिरीजप्रमाणे रेषा कमी होत गेल्या आहेत. त्यामुळे या नोटा चलनात येऊ शकत नाही. आता बँकेच्या या दोषाची शिक्षा ग्राहकांनी का सहन करावी, असाही प्रश्न जावेद विचारत आहेत.
कष्टाने कमावलेले पैसेही ऐन महत्त्वाच्या व्यवहाराच्यावेळी बँकेतून व्यवस्थित मिळाले नाही, तर किती अडचण होते याचा अनुभव आल्याने मोहम्मद जावेद हतबल झाले. अशाप्रकारे गरजेच्या वेळी देखील मोठे शुल्क आकारणाऱ्या बँका व्यवस्थित पैसे देणार नसतील तर ग्राहकांनी कुणाकडे जायचे, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएममधून देखील सदोष नोटा येणार असतील तर मग विश्वास कुणावर ठेवायचा असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे बँक कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये होणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची कोणतीही व्यवस्था ग्राहकांना आज तरी उपलब्ध होताना दिसत नाही. यावर बँक प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे.