नवी दिल्ली : दिल्ली गेल्या दोन दिवसांपासून धुमसत आहे (Delhi Violence ). नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन (सीएए) दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. राजधानीच्या ईशान्य भागातील हिंसाचारात आतापर्यंत 17 जणांचा बळी गेला आहे, तर 56 पोलिसांसह जवळपास 200 नागरिक जखमी झाले आहेत. ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचारानंतर जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर आणि चांदबाग मध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलन
जवाहरलाल नेहरु विद्यार्थी संघाचे (JNUSU) विद्यार्थी आणि नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या काही जणांनी (Delhi Violence) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलन करत होते. दिल्ली हिंसाचाराच्या आरोपींविरोधात कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर शांतता ठेवण्याची मागणी या आंदोलकांची होती. या आंदोलकांना मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरुन हटवण्यात आलं आहे. केजरीवाल यांच्या घराबाहेर असलेल्या विद्यार्थांवर पाण्याचे फवारे मारुन हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अमित शाह सक्रिय
दिल्लीमध्ये अनियंत्रित झालेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीवर गेल्या 24 तासात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन बैठका घेतल्या. गृहमंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीत आयपीएस एसएन श्रीवास्तव यांच्यासह दिल्ली पोलीस आणि गृह मंत्र्यालयाचेअनेक अधिकारी उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेवर चर्चा करण्यात आली. तसेच, कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत चर्चा झाली. आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
तणावग्रस्त भागात परीक्षा रद्द
दिल्लीत हिंसाचारामुळे CBSE बोर्डाने बुधवारी (26 फेब्रुव्रारी) होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. “तणावग्रस्त ईशान्य दिल्लीत आज शाळा बंद राहतील. सोबतच CBSE ची आज होणारी परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली आहे”, असं उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितलं होतं. त्यानंतर (Delhi Violence) आजची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
रात्री उशिरा न्यायायात सुनावणी
CAA विरोधात झालेल्या हिंसाचारातील जखमींना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान, जखमींना घेऊन येण्यासाठी रुग्णवाहिकेची सुरक्षा आणि जखमींना योग्य वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. रुग्णवाहिकेवर संभाव्य हल्ल्याचा धोका पाहता डॉक्टरांच्या टीमने रात्री उशिरा न्यायालयाचं दार ठोठावलं. प्रकरणाचं गांभीर्य पाहता उच्च न्यायालयाने या याचिकेवर रात्री सुनावणी केली आणि मुस्तफाबादच्या रुग्णालयातील जखमींना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचे आदेश पोलिसांना दिले.
आयपीएस सच्चिदानंद श्रीवास्तव दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) विशेष संचालक (प्रशिक्षण) सच्चिदानंद श्रीवास्तव (एस.एन. श्रीवास्तव) यांना मंगळवारी अचानक त्यांच्या मूळ केडरमध्ये परत बोलावण्यात आलं. श्रीवास्तव हे 1985 च्या बॅचचे अग्मुटी केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते गेल्या अनेक काळापासून CRPF मध्ये होते. दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून त्यांना दिल्ली पोलिसांत विशेष आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय ?
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक यांचे आंदोलन सुरु आहे. सोमवारी (24 फेब्रुवारी) या आंदोलनातील काही समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच रस्त्यांवरील वाहने, आजूबाजूची घरे, गोदाम-दुकाने यांनाही आग लावली. मंगळवारीही (25 फेब्रुवारी) दिल्लीत तणावपूर्ण स्थिती होती. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा दिल्लीत तैनात करण्यात आला आहे.
दिल्लीत हिंसाचार : कधी काय घडलं?