पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीपाठोपाठ कार्तिकी वारीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता येत नसेल तर मग उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते होणारी पूजाही रद्द करावी, असा सूर उमटू लागला आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचं आज स्पष्ट केलं. पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी अजित पवार आज पुण्यात आहेत. (Deputy Chief Minister Ajit Pawar will go to Pandharpur on Karthiki Ekadashi)
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत. त्यावेळी कोरोनाच्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनामुळं अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आपण आणि दिलीप वळसे पाटील यांनी एवढी काळजी घेतली तरीही कोरोना झाला. त्यामुळे सर्वांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आषाढीवारीनंतर आता कार्तिक वारीसाठीही आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागले, अशी खंत अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवली. कोरोनाची लस शोधण्याचं काम सुरु आहे. सिरमसारख्या संस्था त्यावर काम करत आहेत. राज्यातील सर्व लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सरकार तयारी करत असल्याची माहितीही अजितदादांनी दिली. असं असलं तरी कुणीही गाफिल राहू नका, योग्य खबरदारी घ्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत आहे. अजितदादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली.
पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी आणि तोडफोडीबाबत आपण इथल्या पोलीस आयुक्तांना सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था मोडण्याचं काम कुणी करत असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे. पोलिसांचा दबदबा कायम राहिला पाहिजे. पोलिसांविषयी आदरयुक्त भीती हवी आणि त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप राहता कामा नये, असं अजितदादा म्हणाले.
2022च्या महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झाल्याचं इथं आल्यावर दिसल्याचं अजित पवार म्हणाले. इच्छुकांनी ओबीसीचे दाखले तयार ठेवले आहेत. मला नाही तर पत्नीला तरी द्याच, हे आताच आपल्याला सांगायला सुरुवात झाल्याची मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी यावेळी केली.
पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी, दिंड्या आणि पालख्यांना प्रवेश बंदी
ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश
संयुक्त महाराष्ट्रच्या वक्तव्यावरुन संताप, कन्नडिगांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतळा जाळला
Deputy CM Ajit Pawar on corona and graduate constituency election