नवी मुंबई : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या आरोपानंतर डीआयजी निशिकांत मोरेंना निलंबित (DIG Nishikan More Suspend) करण्यात आलं आहे. याशिवाय पीडित कुटुंबाला धमकावणाऱ्या ड्रायवरचीही चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.दरम्यान, डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्याने, त्यांना कधीही अटक होऊ शकते. मोरे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे डीआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे. या मुलीने घर सोडण्यापूर्वी रेल्वेखाली जाऊन आत्महत्या करणार असल्याची ‘सुसाईड नोट’ लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये तिने माझ्या आत्महत्येली डीआयजी निशिकांत मोरे जबाबदार असल्याचंही म्हटलं होतं. पोलिसांची पाच पथकं बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत आहेत.
त्याचवेळी, पीडितेच्या कुटुंबाला ‘मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरच्या नावे’ धमक्या येत आहेत. दिनकर साळवे असं धमकी देणाऱ्या ड्रायव्हरचं नाव आहे. कोर्ट परिसरातच साळवेकडून ‘गप्प राहा’ अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. मंगळवारी कोर्टात सुनावणी होण्यापूर्वी धमकी दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पीडित मुलीच्या वडिलांनी 5 जून 2019 रोजी खारघरमध्ये तिच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी त्यांनी आरोपी डीआयजी निशिकांत मोरे यांनाही बोलावलं होतं. वाढदिवस साजरा करताना मुलीच्या भावाने तिच्या चेहऱ्यावर केक लावला. त्यानंतर आरोपी मोरे यांनी पीडित मुलीच्या शरीरावरील केक जिभेने चाटला. आरोपी मोरेंच्या पत्नीनेच याचा व्हिडीओही तयार केला होता. हा व्हिडीओ पीडित मुलीच्या पालकांना पाठवत आरोपी मोरेंपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला होता.
या प्रकरणानंतर पीडित मुलीने आरोपी मोरेंविरुद्ध तक्रार दाखल केली. तर संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी मोरे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना धमकी दिली होती, असं पीडितेच्या वडिलांनी सांगितले. विशेष म्हणजे ही घटना होऊन 5 महिने उलटूनही पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही गंभीर दखल न घेता गुन्हाही दाखल केला नव्हता.
आरोपी निशिकांत मोरेंकडून पीडितेवर पाळत
पीडित मुलगी 21 डिसेंबर 2019 रोजी खारघर येथील एका शॉपिंग सेंटरमध्ये वही खरेदीसाठी गेली होती. आरोपी मोरे यांनी तिथेही पीडितेचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. आरोपी मोरे पाठलाग करत असल्याचं लक्षात येताच मुलीने या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन आरोपीचा चालक आणि अन्य एक कर्मचारी यांना थेट खारघर पोलीस ठाण्यात आणले होते.
खारघरमधील शॉपिंग सेंटरमध्ये मुली ट्युशनसाठी जातात. याच ठिकाणी डीआयजी मोरे माझ्या मुलीचं अपहरण करण्यासाठी पोलिसांच्या गाडीमध्ये आल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला होता. (DIG Nishikant More Molestation Case)