थिंपू : चीनने शनिवारी (4 जुलै) जपान, भारत, तैवाननंतर आता भूतानलाही डिवचले आहे (Dispute of China and Bhutan on border). भूतानसोबत सीमेवरुन कुरापत काढून चीनने इतर तिसऱ्या पक्षाने यात हस्तक्षेप करु नये असंही म्हटलं आहे. याबाबत चीनने पहिल्यांदाच अधिकृतपणे पूर्व भागात भूतानसोबत सीमावाद सुरु असल्याचं मान्य केलं. चीनचं हे वक्तव्य भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जात आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याची सीमा देखील भूतानसोबत आहे. चीन या भागावरही आपला दावा करत आला आहे.
‘चीनचा भूतानशी पूर्व, मध्य आणि पश्चिम सीमेवरुन वाद’
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार चिनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे, ‘चीन आणि भूतानची सीमा कधीही निश्चित झालेली नाही. यावरुनच पूर्व, मध्य आणि पश्चिम भागात वाद सुरु आहे. यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही.’
भूतान आणि चीनमध्ये 1984 पासून 2016 पर्यंत सीमा प्रश्न सोडवण्यासाठी जवळपास 24 टप्प्यात चर्चा झाली आहे. यात केवळ पश्चिम आणि मध्य क्षेत्रातील सीमा प्रश्नावर चर्चा झाली.
‘चीनकडून पूर्व भागात सीमेवरील वादावर पहिल्यांदाच कबुली’
भूतानची राजधानी थिंपूमध्ये राहणाऱ्या या प्रकरणातील तज्ज्ञांनी सांगितलं, “पूर्व सीमेवरील प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये कधीही चर्चा झालेली नाही. दोन्ही देशांमध्ये मध्य आणि पश्चिम सीमा वादावरच चर्चा करण्यात आली. जर चीनला भूतान-चीन सीमेवरील पूर्व सीमेविषयी देखील काही आक्षेप होते तर त्यांनी ते आधीच मांडायला हवे होते.’
भारतीय स्तरावर चीनच्या या नव्या सीमा वादावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नावर भारत काय भूमिका घेतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, शुक्रवारी (3 जुलै) लडाख दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला सांकेतिक भाषेत इशारा दिला होता. विस्तारवादाचं युग संपलं आहे, हे युग विकासवादाचं आहे. आज सुरु असलेल्या विस्तारवादाच्या प्रश्नावर जगभरातील देश एकत्र आले आहेत. विस्तारवादाचा नेहमीच पराभव झाला आहे, असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं होतं.
हेही वाचा :
भारताशी भिडणाऱ्या चीनचा माज, तैवानमध्ये लढावू विमानांच्या घिरट्या, मात्र तैवाननेही टेन्शन वाढवलं
Dispute of China and Bhutan on border