नवी दिल्ली : अमेरिकेत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घट होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला तर मला देश सोडावा लागेल, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन भ्रष्टाचारी असल्याची टीकादेखील ट्रम्प यांनी केली. (Donald Trump said if he lost then he may have leave to country )
रिपब्लिकन पार्टीचा प्रभाव असलेल्या भागात डोनाल्ड ट्रम्प प्रचारामध्ये जोर लावत आहेत. प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्याकडून भावनिक मुद्यांचा वापर करण्यात येतोय. जर माझा पराभव झाला तर देश सोडून जावं लागेल, असं भावनिक आवाहन ट्रम्प यांनी केलं.
डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडेन अमेरिकेला कम्युनिस्ट देश बनवतील. देशात अपराधांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची संख्या वाढेल, असा आरोप ट्रम्प यांनी केला. दरम्यान, अमेरिकेतील माध्यमं जनताविरोधी आहेत, असं देखील ट्रम्प म्हणाले आहेत.
कोरोना विषाणू प्रसारावरुन ट्रम्प सातत्याने चीनचा मुद्दा प्रचारात वापरत आहेत. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेच्या झालेल्या नुकसानाची किंमत चीनला मोजावी लागेल, असा इशारा ट्रम्पंनी प्रचारादरम्यान दिला होता. तर, जर माझा पराभव झाला तर चीन 20 दिवसांत अमेरिकेचा ताबा घेईल, असंही ट्रम्प म्हणाले होते. जो बायडेन यांच्या मुलाबद्दल वैयक्तिक माहिती ट्विटरवर टाकल्यामुळे ट्रम्प यांच्या प्रचाराचे टीम ट्रम्प हे अकाऊंट अस्थायी स्वरुपात ब्लॉक केले होते.
कोरोनावरुन जो बायडेन यांचे टीकास्त्र
डेमोक्रेट पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकेतील वाढत्या रुग्णसंख्येवरून निशाणा साधला. अमेरिकेत वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे देशाची परिस्थिती वाईट होत असल्याची टीका बायडेन यांनी केली.
संबंधित बातम्या :
Donald Trump | ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अकाऊंट ब्लॉक
बायडेन यांच्या प्रचार अभियानाशी संबंधित 3 जणांना कोरोना, कमला हॅरिस ऑनलाईन प्रचार करणार
(Donald Trump said if he lost then he may have leave to country )