पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना यंदाही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने यावेळी देखील पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं असून, पालखी सोहळ्यात कोणालाही घुसू देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहावा असं मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी म्हटलं आहे. त्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालता येणार नाही असं बजावलं. त्यामुळे उद्या संभाजी भिडे आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमणार आहेत. त्यानंतर सर्व पालख्या पुढे गेल्यावर सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जाणार आहेत.
यापूर्वी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आषाढी वारीसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असत. वारकऱ्यांसोबत धारकरी पालखीसोबत जात. मात्र दोन वर्षापूर्वी पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली होती. फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात होती तेव्हा, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षीपासून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गात घुसण्यास विरोध करण्यात येत आहे. तो विरोध यंदाही कायम आहे.
संबंधित बातम्या
शिवप्रतिष्ठानच्या भिडे गुरुजींची पदवी बोगस?
सांगलीत मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी संभाजी भिडे पहिल्या रांगेत!
आंबा प्रकरण : संभाजी भिडेंना नाशिक कोर्टाकडून जामीन
संभाजी भिडेच राष्ट्रवादी चालवतात या वक्तव्यावर मी आजही ठाम : प्रकाश आंबेडकर