बीड : बीडच्या पालवण येथील देवराई प्रकल्पावर आज (13 फेब्रुवारी) पहिल्या वृक्ष संमेलनाचं बिगुल वाजलं. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनाला बीडकरांनी आणि वृक्ष प्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला (Vruksha Sammelan Beed). पहिल्याच संमेलनात नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे या वृक्ष संमेलनाची चर्चा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील होत आहे. विशेष म्हणजे या संमेलनाला वृक्ष संमेलनाचे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मुलीने देखील हजेरी लावली (Doughter of Sayaji Shinde). यावेळी तिने वडिलांच्या या कामाबद्दल आपली भावना व्यक्त केली.
सयाजी शिंदे यांची मुलगी म्हणाली, “मला असं वाटतंय की मी एका देवाची मुलगी आहे. ते खूप महान काम करत आहेत. माझे वडील असून काही उपयोग नाही असं वाटून मला सुरुवातीला वडिलांचा खूप राग यायचा. ते इतर वडिलांप्रमाणेच असते तर बरं झालं असतं. मात्र, आत्ता मला त्यांचं काम पाहून मी त्यांची मुलगी असल्याबद्दल अभिमान आहे. मी एका देवाची मुलगी असल्याची माझी भावना आहे.”
VIDEO: वडील असून काहीच उपयोग होत नाही म्हणून खूप राग यायचा, सयाजी शिंदेंच्या मुलीची प्रतिक्रिया#SayajiShinde #VrukshaSammelan #Beed pic.twitter.com/vFgEBCM7c9
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 13, 2020
देशात सर्वात कमी जंगल म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. अशातच या दुष्काळी जिल्ह्यात ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’चा नारा देत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी वनविभागाच्या पुढाकाराने पालवण येथील देवराई प्रकल्पावर वृक्ष लागवड केली. मागील 4 वर्षांपूर्वी उभारलेल्या या देवराई प्रकल्पावर सध्या वनराई फुलताना दिसून येत आहे. याची प्रचिती सबंध देशभरात पोहोचावी म्हणून सयाजी शिंदे यांनी या ठिकाणी पहिल्या वृक्ष संमेलनाचं आयोजन केलं आहे. दोन दिवस हे संमेलन सुरू राहणार आहे.
दुष्काळी जिल्ह्यात पहिल्यांदाच असं वृक्ष संमेलन भरवण्यात आलं. या संमलेनाला बीडकरांशिवाय अनेक वृक्षप्रेमींनी देखील हजेरी लावली. जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी रॅली काढून या संमेलनात आपला सहभाग नोंदवला. सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पावर एरवीदेखील वेगवेगळे ग्रुप भेटी देत असतात. आज वृक्ष संमेलनाच्या निमित्त सादर सयाजी शिंदे यांच्या मुलींनी देखील या संमेलनात हजेरी लावून आपल्या वडिलांचं कौतुक केलं.
दोन दिवस या संमेलनात जैवविविधतेने नटलेल्या झाडांची माहिती देण्यात येणार आहे. विशेष माहितीची पर्वणी देखील याठिकाणी ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत कधीही न पाहिलेले झाडं येथे आलेल्या चिमुकल्यांना पहायला मिळत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांकडून विशेष सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी येथे असणाऱ्या झाडांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे आता कोणीही वृक्ष तोडू नये, सर्वांनी वृक्षांचं संवर्धन केलं पाहिजे, असं मत औरंगाबादचे उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केलं.
दुर्मिळ वनस्पती, गवताळ परिसंस्था, पर्यावरण, खेळ, सेंद्रिय शेती आणि वृक्ष सुंदरी अशा कार्यक्रमाचं आयोजन याठिकाणी करण्यात आलं. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील तेवढ्याच उत्साहानं सहभाग घेतलाय. त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देखील देण्यात येणार आहे. काही विद्यार्थ्यांनी तर वार्षिक झाडे लावून त्याला जगवण्याचा मानस देखील बोलून दाखवला.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वडाच्या झाडाला मान देण्यात आल्यानं अध्यक्षपदाचा वाद या ठिकाणी दिसून आला नाही. दुष्काळग्रस्त भागात या संमेलनाचं आयोजन करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून याचं कौतुक केलं जात आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात अशाप्रकारे वृक्ष संवर्धनाचे उपक्रम राबवल्यास नक्कीच बीड जिल्ह्यावरील दुष्काळाचा डाग मिटण्यास मदत होईल यात शंका नाही.
Doughter of Sayaji Shinde in Vruksha Sammelan Beed