नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्सबाबत (Driving License) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससाठीची किमान शैक्षणिक मर्यादा हटवली आहे. रोजगार वाढीच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे रस्ते वाहतूक मंत्रालयाने म्हटलं आहे. बस, ट्रक किंवा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.
सध्या केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 च्या नियम 8 नुसार, वाहनचालकाला (transport vehicle driver) किमान आठवीपर्यंतच शिक्षण अनिवार्य होतं. ते आता रद्द करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे वाहन क्षेत्रात असंख्य रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास नितीन गडकरींच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाला आहे. विशेषत: तरुणांना या निर्णयाचा फायदा होईल. शिवाय ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक क्षेत्रात तुटवडा असलेल्या 22 लाख ड्रायव्हर्सची पोकळी भरुन निघेल. त्यामुळेच मोठा रोजगार उपलब्ध होईल, असं रस्ते वाहतूक मंत्रालयाने म्हटलं आहे.
देशभरात अनेक भागात विशेषत: ग्रामीण क्षेत्रात कौशल्य असूनही शिक्षणाविना बेरोजगारी आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक क्षेत्रात शिक्षणाची किमान मर्यादेची अट रद्द केल्याने, त्यांना फायदा होईल, असाही दावा आहे.
अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या युवकांना वाहतूक परवान्याअभावी इच्छा असूनही वाहनचालक म्हणून रोजगार उपलब्ध होत नाही. मात्र,नितीन गडकरी यांनी आठवी पास ही मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबत सरकार नोटिफिकेशन काढणार आहे.
शिक्षणाची अट हटवली असली, तरी चालकांचं प्रशिक्षण, कौशल्य याबाबत अजिबात तडजोड केली जाणार नाही. रस्ते सुरक्षेला प्राधान्य कायम असेल, असंही या मंत्रालयाने म्हटलं आहे.ड्रायव्हिंग परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या वाहनचालकाला कौशल्य चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, असे मंत्रालयाने सांगितले आहे. शिवाय त्याला वाहतुकीचे नियम, सिग्नल, रस्त्यावरील दिशादर्शके यांची जाण असायलाच हवी.