गजानन उमाटे, टीव्ही ९ मराठी, नागपूर: राज्यात यंदा 180 तालुक्यात दुष्काळ आहे. या दुष्काळाचा सर्वात मोठा फटका रब्बीच्या पेरणीला बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचा निम्मा पेरा घटला आहे. राज्यात 20 नोव्हेंबरपर्यंत अवघ्या 27 टक्केच क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वात चिंताजनक म्हणजे अपुरा पाऊस आणि जमिनीत ओलावा नसल्याने डाळवर्गीय पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे राज्यात यंदा डाळींचं उत्पादन घटणार आहे. कृषी विभागाच्या रब्बी पेरणीचा अहवाल ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागला आहे.
राज्यात 56 लाख 93 हजार रब्बीचं क्षेत्र आहे, पण यंदा दुष्काळामुळे 20 नोव्हेंबरपर्यंत अवघ्या 15.51 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागात सर्वात भीषण परिस्थिती असून, औरंगाबाद विभागात अवघी 15 टक्केच पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी 20 नोव्हेंबरपर्यंत राज्यात रब्बीची 55 टक्के पेरणी झाली होती, त्या तुलनेत यंदा रब्बीची पेरणी अवघी 27 टक्केच झाली आहे. ही पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मीच आहे. राज्यात कडधान्याचं
क्षेत्र 16 लाख हेक्टर आहे, त्यापैकी अवघ्या 6 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्रात कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे.
डाळिंच्या एकूण उत्पादनापैकी 60 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन हे रब्बीत घेतलं जातं. पण यंदा दुष्काळामुळे डाळवर्गीय पिकांची पेरणी घटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खरीप आणि रब्बी हे दोन महत्त्वाचे हंगाम आहे. यंदा 180 तालुक्यात दुष्काळ असल्यानं खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय या दुष्काळाने आता रब्बीचा आधारही हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या भीषण संकटात आहे, अशा स्थितीत कागदी घोड्यांचा खेळ न खेळता सरकारनं युद्ध पातळीवर उपाययोजना करुन शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे.