पॉपकॉर्न खाणं जीवावर, दातात अडकल्याने ओपन हार्ट सर्जरीची वेळ

| Updated on: Jan 08, 2020 | 3:45 PM

41 वर्षीय मार्टिनने सप्टेंबर महिन्यात पॉपकॉर्न खाल्ले होते. या पॉपकॉर्नचा छोटासा तुकडा त्यांच्या दातात अडकला. हा तुकडा काढण्यासाठी मार्टिनने पेन, टुथपीक, तार आणि टाचणीचा वापर केला. त्यामुळे त्यांच्या दातात संसर्ग झाला.

पॉपकॉर्न खाणं जीवावर, दातात अडकल्याने ओपन हार्ट सर्जरीची वेळ
Follow us on

ब्रिटन : पॉपकॉर्न हा खायला जेवढा खुसखुशीत आणि चविष्ट लागतो, तो तेवढाच नुकसानदायक पण ठरु शकतो. असंच काहीतरी ब्रिटनच्या एका व्यक्तीसोबत झालं आहे. या व्यक्तीला पॉपकॉर्न खाणं जीवावर बेतलं आहे. त्याने पॉपकॉर्न खाल्ले आणि पॉपकॉर्नचा एक तुकडा त्याचा दातात अडकला, त्यामुळे त्याच्या दातात संसर्ग झाला. अनेक अवजारं वापरली, मात्र पॉपकॉर्नचा तो तुकडा त्याच्या दातातून निघाला नाही. अखेर त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याची ओपन हार्ट सर्जरी करावी लागली.

अॅडम मार्टिन असं या व्यक्तीचं नाव आहे. 41 वर्षीय मार्टिनने सप्टेंबर महिन्यात पॉपकॉर्न खाल्ले होते. या पॉपकॉर्नचा छोटासा तुकडा त्यांच्या दातात अडकला. हा तुकडा काढण्यासाठी मार्टिनने पेन, टुथपीक, तार आणि टाचणीचा वापर केला. त्यामुळे त्यांच्या दातात संसर्ग झाला. पॉपकॉर्नचा अडकलेला तुकडा काढण्याच्या प्रयत्नात मार्टिन यांच्या जबड्याला मोठं नुकसान झालं.

फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, मार्टिन यांच्या जबड्यातील संसर्ग त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला. मार्टिन यांना रात्री घाम फुटू लागला, घाबरल्यासारखं वाटू लागलं, डोकं दुखू लागलं. अनेक दिवस त्यांना हे सर्व त्रास होत राहिले. त्यानंतर त्रास असह्य झाल्यानंतर मार्टिन रुग्णालयात तपासणीसाठी गेले. तिथे त्यांच्या हृदयात इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेतले आणि त्यांची ओपन हार्ट सर्जरी आणि पायाची शस्त्रक्रिया  करण्यात आली.

“मला माहित होतं की, माझी तब्येत बिघडत आहे. मला रात्री झोप नव्हती येत, डोक नेहमी दुखत राहायचं. ज्या दिवशी मी रुग्णालयात येऊन तपासणी केली, त्याच दिवशी मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर माझी ओपन हार्ट सर्जरी आणी पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मी मृत्यूच्या दारात होतो, नशिबाने माझा जीव वाचला. आता मी आयुष्यात कधीही पॉपकॉर्न खाणार नाही”, असं अॅडम मार्टिनने सांगितलं.

Eating popcorn is lead to man open heart surgery

>