औरंगाबाद : कोरोनामुळे रखडलेल्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचे निकाल येत्या 10 ऑक्टोबरपासून लागायला सुरुवात होईल. या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा देण्यात येणार नाही. तसेच या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. (Uday Samant On Final year Exam Result And Degree Certificate)
“अंतिम वर्षातील 1 लाख 16 हजार 400 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 90 ते 92 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील अशी नोंद विद्यापीठाकडे झाली आहे. तर उरलेले 10 टक्के विद्यार्थी हे स्वत: जवळच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
“जवळपास 11 हजार विद्यार्थी हे जिल्ह्याच्या विविध ठिकाणी आणि शहरात परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांना ऑफलाईन परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक असून योग्य ते निर्देश दिले आहेत.
तसेच Question bank, Mock test यानंतरही काही तांत्रिक अडचणीमुळे जर विद्यार्थ्यांची परीक्षा राहिली तर ती परीक्षा विद्यापीठ तातडीने घेणार आहे. म्हणजेच नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने एका महिन्यात घेतली जाईल. त्यांनाही पदवीचे प्रमाणपत्र दिले जाईल,” असेही उदय सामंत म्हणाले.
“या पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोव्हिड 19 असा कोणत्याही प्रकारचा शेरा दिला जाणार नाही. हे पदवीचे प्रमाणपत्र हे गेल्यावर्षीप्रमाणेच दिलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनात कोणाताही संभ्रम ठेवू नये.”
“या प्रमाणपत्राचा आदर हा सर्व ठिकाणी पूर्वीप्रमाणे केला पाहिजे. या पदवीकडे जर कोणी बघत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी,” असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. (Uday Samant On Final year Exam Result And Degree Certificate)
संबंधित बातम्या :