जळगाव : मी अजूनही भाजपमध्ये असतो तर वाजपेयी-अडवाणींसारखी माझी अवस्था झाली असती, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी दिली आहे. माझा भाजपवर राग नाही. पण काही प्रवृत्तींनी मला भयंकर त्रास दिला, असं म्हणत त्यांनी फडणवीसांकडे पुन्हा एकदा बोट दाखवलं. (Eknath khadase Attacked Devendra fadanvis)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत खडसेंनी आपल्या मनगटावर घड्याळ बांधल्यानंतर ते आपल्या मुळगावी आज परतले. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं.
“भारतीय जनता पक्षात माझ्यावर मोठा अन्याय सुरु होता. तिथल्या काही प्रवृत्तींनी जाणून बुजून मला टार्गेट केलं. सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीसांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. मला खेदाने सांगावंस वाटतं की मी आणखीही भाजपमध्ये असतो तर माझी अवस्था वाजपेयी-अडवाणींसारखी झाली असती”, असं खडसे म्हणाले.
“वाजपेयी-अडवाणी एवढे जेष्ठ नेते असून देखील त्यांची पक्षात अशी अवस्था झाली तर मग आपलं काय होणार होतं? हा सगळा एकंदरित विचार करुनच मी पक्षांतराचा निर्णय घेतला. मी यानिमित्ताने शरद पवारांचे आभार मानतो की त्यांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यांनी जर प्रवेश दिला नसता तर माझे राजकीय जीवन थांबले असते”, असं खडसे म्हणाले.
“भाजपमध्ये मिळत असलेल्या वागणुकीबद्दल कार्यकर्ते चिडायचे. ते माझ्याजवळ संताप व्यक्त करायचे. भाऊ तुम्ही अन्याय सहन करु नका, तुम्ही योग्य निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं कार्यकर्ते सांगायचे आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे मी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला”, असं खडसे म्हणाले.
तत्पूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच आपल्या मूळगावी कोथळी गावी आले. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचं रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
(Eknath khadase Attacked Devendra fadanvis)
संबंधित बातम्या
भाजप खासदार असलेल्या सुनबाईंनी केलं राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचं स्वागत