मुंबई: शिवसेना आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या सत्ता संघर्षाचा अखेर शेवट झाला आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. अवघ्या दहा दिवसांत महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा खेळ पटवणारे एकनाथ शिंदे चांगलेच चर्चेत आले. गूगल सर्चमध्येही त्याचे नाव टॉपवर होते. 10 दिवस शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ‘बंडखोर’ झालेल्या शिंदे यांनी आता भाजपसोबतची ही राजकीय लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याच्या घोषणेनंतर त्यांची राजकीय काराकिर्द देखील चर्चेत आली आहे. त्यांचे कुटूंबिय त्यांचा जीवन प्रवास याबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती सर्च होत आहे(Eknath Shinde Profile).
एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींमध्येही त्यांची गणना होते. 2019 मध्ये मुख्यमत्री पदाची शर्यत सुरू असताना त्यांनी ठाकरेंना पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. पण, आता शिंदे यांनी सगळा खेळच फिरवला आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारे शिंदे हे विरोधी पक्षाचे नेतेही राहिले आहेत. शिंदे यांनीही अनेक आघाड्यांवर शिवसेनेचा बचाव केला आहे, मात्र आता त्यांनी थेट ठाकरेंना आव्हान दिले आहे.
शिंदे यांचे कुटुंब राजकारणात सक्रीय असून त्यांचा मुलगा श्रीकांत खासदार असून भाऊ प्रकाश शिंदे हे नगरसेवक आहेत. एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले. 2014 आणि 2019 या दोन्ही सरकारमध्ये त्यांनी मंत्री पदही भूषवले आहे. यापूर्वी 2004 आणि 2009 मध्येही ते आमदार होते.
1980 मध्ये त्यांनी शिवसेना शाखाप्रमुख आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली . 1997 मध्ये ठाणे महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आल्यावर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. यानंतर त्यांनी ठाणे महापालिकेत अनेक पदे भूषवली आणि त्यानंतर 2004 मध्ये आमदार म्हणून राज्याच्या राजकारणात आले. त्यानंतर अनेक वेळा विजयी झाले आणि दोनदा राज्यात मंत्रीही राहिले. यापूर्वी ते महाराष्ट्र सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते .
निष्ठावान शिवसैनिक अशी ओळख असलेले शिंदे पक्षासाठी तुरुंगातही गेले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 14 कोटी आहे. पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे असा त्यांचा परिवार आहे.
शिवसेनेचे शक्तिशाली नेते होण्यापूर्वी शिंदे ऑटोरिक्षा चालवायचे. शिंदे यांनी मुले गमावल्यानंतर राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांचे गुरू आनंद दिघे यांनी त्यांना पुन्हा राजकीय जीवनात आणले. ठाण्याचे नेते दिघे यांनी त्यांना ठाणे महापालिकेत सभागृह नेते केले. 2001 मध्ये दिघे यांच्या निधनानंतर शिंदे यांच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली. ठाणे आणि संपूर्ण राज्यात शिवसेना मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचं गाव. ते शिक्षणासाठी ठाण्यात आले होते. गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. पण त्यातून मिळकत होत नव्हती. म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं 18 वर्ष. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्ला. मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपा झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.
शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात फ्रंटवर असलेल्या एकनाथ शिंदेंना 1997 हे वर्ष अत्यंत लकी ठरलं. 1997मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर 2004मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2014मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 2019मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत.
नम्र, मितभाषी, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे.
आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं मोठं योगदान
आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं योगदान मोठं आहे. ठाणे पालिका, जिल्हापरिषदा, अंबरनाथ नगरपरिषद, कल्याण-डोंबिवली पालिका, बदलापूर नगरपरिषदेपासून ते नाशिकपर्यंत शिंदे यांनी शिवसेनेचं जाळं विणलं आहे. ठाण्यापासून नाशिकपर्यंत शिंदेंचा शब्द प्रमाण मानला जातो.
एकनाथ शिंदे यांना गरीबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. केवळ इयत्ता दहावीपर्यंतच ते शिकले. त्याचं शल्य त्यांना नेहमीच बोचत होतं. त्यामुळे त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातून त्यांनी पदवी परीक्षा दिली आहे. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे. अर्धवट शिक्षण पूर्ण करून त्यांनी एक प्रकारचं अपूर्ण रिंगण पूर्ण केलं आहे. त्यांचं शिक्षण कमी झालं असलं तरी त्यांनी त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर बनवलं. श्रीकांत हे कल्याण विधानसभा मतदारसंघातील खासदारही आहेत.