Election | पाच जणात प्रचार, ऑनलाईन अर्ज, ‘कोव्हिड’ काळात निवडणुकांसाठी आयोगाच्या मार्गदर्शक सूचना

| Updated on: Aug 21, 2020 | 5:23 PM

नामांकन अर्ज, प्रतिज्ञापत्र ऑनलाईन भरा, अनामत रक्कमही ऑनलाईन ट्रान्स्फर करा, तर नामांकन अर्ज भरताना केवळ दोघांना कार्यालयात जाण्यास मुभा असेल.

Election | पाच जणात प्रचार, ऑनलाईन अर्ज, कोव्हिड काळात निवडणुकांसाठी आयोगाच्या मार्गदर्शक सूचना
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने कोविड19 दरम्यान सार्वत्रिक निवडणुका/ पोटनिवडणुका आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात, तर निवडणुकीशी संबंधित कामकाजादरम्यान प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे. (Election Commission of India issues guidelines for the general elections during COVID-19)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्वच निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र बिहार विधानसभा निवडणुका ठरल्या वेळीच होण्याचे संकेत निवडणूक आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी दिले. त्यानंतर आगामी काळातील निवडणुकांसाठी आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

काय आहेत मार्गदर्शक सूचना?

1. निवडणुकीशी संबंधित कामकाजादरम्यान प्रत्येकाने फेस मास्क घालणे आवश्यक
2. अ. प्रत्येक खोली/हॉलच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक
2. ब. सॅनिटायझर, साबण, पाणी यांची व्यवस्था करावी
3. केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकारने दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा नियमांचे काटेकोर पालन
4. सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, यासाठी शक्यतो मोठे हॉल निवडणुकांसाठी वापतावेत
5. पोलिंग अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांच्या वाहतुकीसाठी पुरेशा वाहनांची व्यवस्था करावी

इव्हीएम/व्हीव्हीपॅट हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्लोव्हज पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य, जिल्हा आणि विधानसभा स्तरावर नोडल आरोग्य अधिकारी नेमून सर्व नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करण्यासही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

नामांकन अर्ज, प्रतिज्ञापत्र ऑनलाईन भरा, अनामत रक्कमही ऑनलाईन ट्रान्स्फर करा, तर नामांकन अर्ज भरताना केवळ दोघांना कार्यालयात जाण्यास मुभा असेल.

टपाल मतपत्रिकेचा पर्याय दिव्यांग व्यक्ती, 80 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मतदार, अधिसूचित अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि कोविड19 पॉझिटिव्ह/ संभाव्य संक्रमित अशा मतदारांना देण्यात आला आहे.

प्रचार कसा?

दारोदार प्रचार करण्यासाठी उमेदवारासह केवळ पाच जणांना मुभा (सुरक्षा अधिकारी वगळून) देण्यात आली आहे. रोड शो करताना वाहनांच्या दोन ताफ्यांची पाच-पाच मध्ये विभागणी करावी. दोन ताफ्यांमध्ये 100 मीटरऐवजी अर्ध्या तासाचे अंतर असावे. सभा आणि रॅली यांच्यासाठी जिल्हा स्तरावर कोव्हिड प्रादुर्भाव पाहून निर्णय घेण्याच्या सूचना आहेत.

(Election Commission of India issues guidelines for the general elections during COVID-19)