पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं घेतली. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं घेतलेल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेच्या निकालात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Error in Savitribai Phule Pune University online exam results)
अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेच्या निकालात त्रुटी आढळून आल्याने आता विद्यापीठाकडून अंतिम वर्ष निकालाची फेरतपासणी करण्यात येणार आहे. तशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परीक्षा देऊनही 18 हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण असं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं विद्यापीठाकडून 8 हजार विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी करण्यात येत आहे. तशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर महेश काकडे यांनी दिली आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेतील अडचणींबाबत विद्यार्थ्यांकडून 13 हजारापेक्षा अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या अडचणी दूर करण्याचं काम विद्यापीठाकडून करण्यात येत होतं. परीक्षेदरम्यान लॉगिन न होणं, प्रश्न न दिसणं, आकृत्या न दिसणं, उत्तरपत्रिका सबमिट न होणं, सर्व्हर जाणं अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता.
विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचं विभाजन करुन त्यावर निर्णय घेण्यात काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आलं. विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या जवळपास अडीच लाख विद्यार्थांची परीक्षा घेण्यात आली. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं ही परीक्षा पार पडली. मात्र, ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना एक गुगल फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला. या फॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी विद्यापीठ प्रशासनाकडे नोंद करता आल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला 12 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली होती. मात्र, पहिल्याच दिवशी ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा झालेला पाहायला मिळाला होता. पुणे विद्यापीठाकडून ऑनलाईन पाठवल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट करण्यासाठी आवश्यक असणारा ‘ओटीपी’च आला नाही. त्यामुळे पहिल्या सत्रातील ऑफलाईन परीक्षा ठप्प झालेली पाहायला मिळाली.
online exams | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली, परीक्षेची नवी तारीख जाहीर
पुणे विद्यापीठात ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा, प्रश्नपत्रिकांच्या प्रिंटसाठी ‘ओटीपी’च मिळाला नाही
Error in Savitribai Phule Pune University online exam results