मुंबई : फेसबुकवर तुमची टाईमलाईन पाहताना गेल्या दोन-तीन दिवसात एक व्हिडीओ (Viral Video) हमखास तुमच्या नजरेत आला असणार. पॅराग्लायडिंगचा (Paragliding) पहिलाच अनुभव घेणाऱ्या तरुणाची आकाशात गेल्यावर भंबेरी उडाल्याचा हा व्हिडीओ. पण हा तरुण कोण आहे? त्याने हा व्हिडीओ का तयार केला आणि तो कसा वायरल झाला, या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला तुम्हालाही आवडेल.
पॅराग्लायडिंगसारखे साहसी खेळ करण्याची अनेक जणांची इच्छा असते. मात्र शहराच्या जवळपास या सुविधा नसल्यामुळे अनेक जणांची इच्छा राहून जाते. पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवण्याची संधी मिळाल्यावर ते क्षण कॅमेरात कैद कोण करणार नाही? असाच एक तरुण हातात सेल्फी स्टिक घेऊन उत्साहाने पॅराग्लायडिंग करायला लागला. सुरक्षेची काळजी घेणारा एक इन्स्ट्रक्टरही त्याच्यासोबत होता.
काय आहे व्हिडीओमध्ये?
पॅराग्लायडिंगला सुरुवात करण्यापूर्वी त्याला धावत जाण्यास सांगितलं गेलं होतं. बसलास तर खाली पडशील, असंही त्याला बजावण्यात आलं. सूचनांचं पालन करत तरुणाने धावायला सुरुवात केली आणि आकाशात झेप घेताच पॅराग्लायडिंग सुरु झालं.
आकाशात जाताच तरुणाच्या अंगात वीज संचारली. सेल्फी कॅमेरामध्ये त्याने कॉमेंट्री सुरु केली. माझ्या चारही बाजूंनी धुकं आहे. खूप उंचावर आलो आहोत, मात्र उत्साह मावळायला अर्धा मिनिट पुरेसा होता. आकाशात विहरत असतानाच अचानक तरुणाने गच्च डोळे मिटून घेतले. पॅराग्लायडिंग करताना वाटणारी भीती त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती.
‘भाई लँड करा दो’, ‘मुझे लंबी राईड नही करनी’ असं तो पुटपुटायला लागला. काही सेकंदातच आई, दादा अशा नावांचा जप त्याने सुरु केला. त्यानंतर ‘नाही-नाही-नाही’ असा लावलेला धोशा काही केल्या थांबत नव्हता. मध्येच त्याच्या तोंडून शिव्यांची सरबत्ती सुरु झाली. इन्स्ट्रक्टर त्याला पाय वर करण्याच्या सूचना देत होता, मात्र उसनं अवसान आणूनही त्याला ते झेपत नव्हतं.
दोनशे-पाचशे रुपये जास्त घे, पण लँड कर, असं तो वारंवार इन्स्ट्रक्टरला सांगत होता. पाय सरळ कर, नाहीतर तुटतील, असं दरडावणारा इन्स्ट्रक्टर थोड्या वेळाने मवाळ झाला. अरे बाबा, पाय सरळ कर, अशी गयावया करु लागला. अखेर हो-नाही म्हणता म्हणता दोघं लँड झाले, तेव्हा कुठे साहेबांच्या तोंडून शिव्यांचा पट्टा थांबला.
कोण आहे हा तरुण?
पॅराग्लायडिंग करताना तंतरलेल्या या तरुणाचं नाव आहे विपीन साहू. उत्तर प्रदेशातील बांद्याचा तो रहिवासी आहे. विपीनचा टाईल्स विक्रीचा व्यवसाय आहे. मनालीमध्ये सहलीला गेला असताना त्याने पॅराग्लायडिंग केलं आणि हा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ त्याच्या धाकट्या भावाने सोशल मीडियावर अपलोड केला आणि विपीन कमालीचा प्रसिद्ध झाला.
उंचीची भीती
उंचीची भीती अनेक जणांना वाटते, मात्र काही जणांना उंचीचा फोबिया असतो. फोबिया ही संकल्पना आता सर्वांना परिचयाची आहे. साध्या भाषेत फोबिया म्हणजे एखाद्या भीतीतून मनात निर्माण होणारे अतिरिक्त ताण-तणाव. उंच इमारत, डोंगर अशा ठिकाणी गेल्यावर किंवा उंचावरुन घेतलेले फोटो पाहून ज्यांना भीती वाटते, त्यांना ‘अॅक्रोफोबिया’ असतो. ‘बाजीगर’ चित्रपटात शिल्पा शेट्टीने साकारलेल्या व्यक्तिरेखेला हा फोबिया होता.
बंद खोली, उंची, पाणी, कोळी अशा कुठल्याही गोष्टीचा फोबिया असू शकतो. अशा परिस्थितीत चक्कर येणं, मळमळणं, कापरे भरणं, घाम फुटणं, हृदयाची धडधड वाढणं, छातीत दुखणं अशी सर्वसामान्य लक्षणं असतात.