मुंबई : एकीकडे काँग्रेसच्या ‘कोरोना’ टास्कफोर्सच्या व्हिडीओ कॉन्फरन्स, तर दुसरीकडे रस्त्यावर उतरुन जनजागृती करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ‘कोरोना’विरोधात लढा उभारत आहेत. साताऱ्यात विविध ठिकाणी जाऊन सोशल डिस्टन्सिंग पाळत चव्हाण ‘कोरोना’विषयी मार्गदर्शन करत आहेत. (Prithviraj Chavan Campaign on How to prevent Corona)
पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातील आपल्या ‘कराड दक्षिण’ मतदारसंघात ‘कोरोना’विरोधी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. अनेक गावात स्वत: जाऊन मुख्य चौकात ध्वनिक्षेपकावरुन ते थेट जनतेशी संवाद साधत आहेत. सामान्य नागरिकांना ‘कोरोना’ विषाणूंच्या संसर्गाच्या दुष्परिणामांची माहिती देत आहेत.
‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबतही ते मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर होताना दिसत आहे. कोरोनाला गांभीर्याने न घेणाऱ्या लोकांना या आजाराची भीषणता समजून येत आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन रविवारी जनतेशी संवाद साधला. ‘कोरोनाचे संकट सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क बांधावा, ठराविक अंतर ठेवून राहावे, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत, प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणेला साथ द्यावी, जबाबदारीने वागावे, सुरक्षिततेसाठी घरीच रहावे’, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला.
आज कराड येथील भाजी मंडई येथे भाजी विक्रेत्यांशी व गिऱ्हाईकांशी संवाद साधला. सामाजिक अंतराच्या सर्व अटी पाळून लाऊड स्पीकरवरून बोललो. pic.twitter.com/75c2Nh9MOo
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 19, 2020
पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना काँग्रेसने केली आहे. माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे या टास्क फोर्सचे समन्वयक आहेत. या टास्क फोर्समध्ये खासदार राजीव सातव, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासह 18 सदस्य आहेत. तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रिसर्च विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख हे टास्क फोर्सचे सचिव आहेत.
(Prithviraj Chavan Campaign on How to prevent Corona)