नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत असं सांगणारे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मेसेजमध्ये मोदी लॅपटॉप योजना सुरु असल्याचे सांगत एक वेबसाईटही देण्यात आली आहे. मोफत लॅपटॉप मिळवण्यासाठी या वेबसाईटवर नावनोंदणी करण्यास सांगण्यात येत आहे. मात्र, ही योजना खरोखर मोदींनी सुरु केली आहे का? या योजनेमागील सत्य काय? असे प्रश्न नागरिकांना पडत आहेत.
केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आल्याबद्दल मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत, अशी माहिती देणारा हा मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. या मेसेजमध्ये मेक इन इंडियाच्या लोगोचाही वापर करण्यात आला असल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसला. यात लॅपटॉप मिळवण्यासाठी www.modi-laptop.wishguruji.com या संकेतस्थळावर नावनोंदणी करा, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार तब्बल 15 लाख लोकांनी तेथे नावनोंदणी केली. नावनोंदणी सोबतच आधार कार्ड, बँक खाते अशा अनेक गोपनीय गोष्टींची माहिती या संकेतस्थळावर विचारण्यात आली होती. या माहितीच्या आधारे आर्थिक फसवणूक करण्याचा उद्देश असल्याचे आता समोर आले असून ही योजना फसवी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्ली पोलिसांनी या फेक वेबसाईटचा पर्दाफाश केला आहे. लॅपटॉपचे आमिष दाखवून लोकांची गोपनीय माहिती चोरणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. राकेश जांगीड असं या तरुणाचं नाव असून तो आयआयटी दिल्लीचा पदवीधारक आहे. 23 वर्षांचा राकेश जांगीड राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील पुंडलोटाचा रहिवासी आहे. त्याने 2019 मध्ये आयआयटी दिल्ली येथून पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्याने आत्तापर्यंत या योजनेतून तब्बल 15 लाख लोकांची माहिती गोळा केली होती. त्याआधारे त्या लोकांची फसवणूक करण्याचा त्याचा उद्देश होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या योजनेच्या नोंदणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेबसाईटचा उल्लेख केला जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. modi-laptop.saarkari-yojna.in या वेबसाईटसह modi-laptop.wish-karo-yar.tk, modi-laptop.wishguruji.com आणि free-modi-laptop.lucky.al या फसव्या वेबसाईट्सचाही उपयोग होत आहे. यातील एकही वेबसाईट सरकारी नाही.
या फसव्या योजनेचा उद्देश काय?
जर या योजनेतून लॅपटॉप मिळणार नसेल तर मग ही माहिती भरुन घेण्याचा उद्देश काय आहे असाही प्रश्न पडू शकतो. हे समजून घेण्यासाठी सध्याच्या काळात माहितीचे (डेटा) मुल्य समजून घ्यावे लागले. मार्केटिंग एजन्सी, बँक, विमान कंपन्या यांना सेवा देण्यासाठी ग्राहकांच्या व्यक्तिगत माहितीची मोठ्या प्रमाणात गरज असते. या सर्वांसाठी माहिती गोळा करण्याचे काम या वेबसाईटकडून केले जाते.
या फसव्या वेबसाईटच्या आधारे मोठ्या प्रमाणात लोकांची माहिती गोळा केली जाते. त्यात नाव, वय, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अशी सर्वसाधारण माहिती घेतली जाते. नंतर ही माहिती मार्केटिंग एजन्सीला विकली जाते.
अनेकदा अशा वेबसाईट नागरिकांचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर काही लिंक्स पाठवतात. त्या लिंकवर आमिष दाखवणाऱ्या योजनांची माहिती दिली जाते. मात्र, या लिंकवर क्लिक केले की फोन हॅक होतो. काही अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्याद्वारे मोबाईलमधून कोणत्याही परवानगीशिवाय युजर्सची माहिती चोरी केली जाते.