अहमदनगर: राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत हवालदिल झाल्याचं चित्र पुन्हा समोर आलं आहे. कारण कष्टाने पिकवलेल्या कांद्याला मातीमोल दाम मिळत असल्याने, वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आधी पंतप्रधानांना त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना मनी ऑर्डरने पैसे पाठवणे सुरु केलं आहे. नाशिकच्या एका शेतकऱ्याने कांदा विक्रीतून आलेले पैसे मनीऑर्डरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. त्यानंतर आता शिर्डीच्या एका शेतकऱ्याने कांदा विक्रीतून शिल्लक राहिलेले अवघे 6 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहेत. याशिवाय नाशिकच्या येवल्यातील एका शेतकऱ्याला कांद्याला केवळ 51 पैसे भाव मिळाल्याने, त्यानेही 216 रुपयांची मनी ऑर्डर मुख्यमंत्र्यांना केली आहे.
कांदा विक्रीतून 6 रुपये
संगमनेरच्या अकलापूर येथील श्रेयस आभाळे यांनी दोन एकर कांद्याची लागवड केली. त्यातून त्यांना जवळपास तीन टन कांद्याचं उत्पन्न मिळालं. जीवापाड मेहनतीने कांदा पिकवला, मात्र त्याला मातीमोल भाव मिळाला. अवघे सहा रुपये खिशात घेऊन कसे यायचे, यापेक्षा त्यांनी तेच सहा रुपये मुख्यमंत्र्यांना पाठवले. मनीऑर्डर करुन श्रेयस आभाळे यांनी हे सहा रुपये मुख्यमंत्र्यांना पाठवले.
कांद्याला 51 पैसे भाव
दुसरीकडे नाशिकच्या येवला तालुक्यातील अंद्रसूल गावच्या चंद्रकांत भिकान देशमुख यांनाही हाच अनुभव आला. चंद्रकांत देशमुख यांनी 545 किलो कांदा विक्रीतून केवळ 216 रुपये मिळाले. म्हणजेच कांद्याला केवळ 51 पैसे प्रति किलोचा भाव मिळाला. येवल्यातील कांदा लिलावात त्यांना हा तुटपुंजा भाव मिळाला. त्यामुळे हतबल झालेल्या चंद्रकांत देशमुख यांनीही 216 रुपयांची मनी ऑर्डर मुख्यमंत्र्यांना केली.
आमच्या भागात दुष्काळाची स्थिती आहे. त्यातच कसाबसा कांदा पिकवला. मात्र त्याला हा भाव मिळाल्याने घर चालवायचं कसं? हा प्रश्न आहे. माझा कांदा उत्तम प्रतिचा होता, तरीही त्याला हा भाव मिळाल्याने मी तो कांदा मुख्यमंत्र्यांना पाठवला, असं चंद्रकांत देशमुख यांनी सांगितलं.
यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संजय साठे यांनीही कांदा विक्रीतून उरलेले 1064 रुपये मनी ऑर्डरने पंतप्रधान मोदींना पाठवले. मात्र या शेतकऱ्याची चौकशी सुरु झाली आहे. शेतकरी संजय साठे एखाद्या पक्षाशी संबधित आहे का, शेती किती, एखाद्या पक्षाने सांगितल्यावरून हा स्टंट केला का अशा अनेक अंगाने ही उलटसुलट चौकशी होत आहे. त्यामुळे संजय साठे पुरते वैतागले आहेत. यातच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या विषयावर तयार झालेल्या अहवालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यातील आशयावरून त्यांना अधिकच धक्का बसला आहे.
संबंधित बातमी
कांद्याचे पैसे मोदींना पाठवल्याने इगो हर्ट, शेतकऱ्याची चौकशी सुरु