68 गावांतील 15 हजार शेतकरी, कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर

| Updated on: Feb 24, 2020 | 3:05 PM

34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती रजिस्टर झाली आहे. अद्याप 1 लाख 61 हजार खात्यांची माहिती येणे बाकी आहे.

68 गावांतील 15 हजार शेतकरी, कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. 68 गावांमधील 15 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे.  विधीमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही यादी जाहीर करण्यात आली. (Farmer Loan waiver First list)

34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती रजिस्टर झाली आहे. अद्याप 1 लाख 61 हजार खात्यांची माहिती येणे बाकी आहे. आज प्रकाशित झाली यादी त्यामध्ये 68 गावातील 15 हजार 368 लोकांची नावं आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश आहे. 4500 जणांना आधार प्रमाणपत्र दिलं. 24 तासात त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहेत.

कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले आणि हेरले या दोन गावातील नावांची यादी आज प्राथमिक टप्प्यावर जाहीर झाली आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत आसुर्ले इथं हे काम सुरु आहे.

अहमदनगर
972 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ब्राह्मणी (ता. राहुरी) गावातील 856, तर जखणगाव (ता. नगर) मधील 116 शेतकऱ्यांची नावं या यादीत आहेत. नगर जिल्ह्यात 2 लाख 15 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची माहिती आहे.

उस्मानाबाद

तामलवाडी आणि पाथरूड या दोन गावातील 312 शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी जाहीर केली आहे.

हिंगोली

236 शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीत समावेश झाला आहे. हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या गावांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भेट दिली.

कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफी यादी जाहीर झाल्यांनतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती आहे. (Farmer Loan waiver First list)

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“ज्या शेतकऱ्यांचं पीककर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचं आहे, त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा आम्ही नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. ही पहिली यादी आहे, अंतिम नाही. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना लाभ मिळाल्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने यादी जाहीर करु.’ असं उद्धव ठाकरे काल म्हणाले होते.

पहिल्या यादीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गावांच्या 20 हजार शेतकऱ्यांच्या नावाची घोषणा होईल. दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर होईल. येत्या तीन महिन्याच्या कालावधीत ही योजना पूर्ण होईल. एप्रिलच्या अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल, असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

आत्तापर्यंत सरकारकडे 35 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती आली आहे. त्यावर काम सुरु झालं आहे. टप्प्याटप्प्याने ही यादी जाहीर केली जाईल. यात पूर्ण पारदर्शकता असेल. पहिल्या सरकारच्या काळात आम्ही लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, ती यादीच जाहीर झाली नाही. म्हणून आम्ही प्रथम याद्या तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. (Farmer Loan waiver First list)