बीड : राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी पुस गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित केल्या होत्या. जमीन हस्तांतरित करण्याआधी शेतकऱ्यांच्या मुलाला साखर कारखान्यात नोकरी, तसेच शेतीचा मावेजा देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र आठ वर्षांनंतर हे आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
धनंजय मुंडेंकडून आमची फसवणूक झाली, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. शिवाय आमची शेती आम्हाला परत द्यावी, अशा विविध मागणीसाठी शेतकरी कुटुंबं धरणे आंदोलनासाठी बसले.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 2006 ते 2010 या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल 25 कोटी रुपयांचं भागभांडवालही उभं केलं. मात्र कारखाना काही सुरु झाला नाही.
या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली. जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले.
पुढे जगमित्र साखर कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली आणि हा कारखाना सुरु होण्याआधीच बंद पडला. पण त्यानंतरही कारखान्याने जमीन परत केली नाही. तेव्हापासून राजाभाऊ फड हे सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी त्यांनी औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले होते.
संबंधित बातम्या
स्पेशल रिपोर्ट : धनंजय मुंडेंना सुप्रीम कोर्टाकडून खरंच दिलासा मिळालाय का?
आरोपी क्रमांक 10… धनंजय मुंडेंविरोधात ‘420’चा गुन्हा दाखल
जमिनींचं खरेदीखत गुन्हा असतो, कारस्थान नाही, धनंजय मुंडेंना धस यांचं उत्तर