आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी देशविदेशातील किसानपुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार (Fast For Farmers Suicide) आहेत. हा उपवास म्हणजे वेदनेला दिलेला प्रतिसाद आहे
शेतकऱ्यांची पहिली सहकुटुंब आत्महत्या
19 मार्च 1986 या दिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असहय्य (Fast For Farmers Suicide) झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. पती-पत्नी आणि चार मुलांचे शव एका खोलीतून काढण्यात आले तेंव्हा सारा महाराष्ट्र हादरला होता. साहेबराव करपे हे चिल-गव्हाण (यवतमाळ) चे राहणारे. संगीताचे जाणकार होते. गावच्या सरपंचपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे वर्णन केले होते आणि सरकारने शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून गंभीरपणे उपाययोजना करण्याचे सुचवले होते. त्यांना वाटले होते की आपले मरण शेतकऱ्यांना चांगले जीवन मिळवून द्यायला कारणीभूत ठरेल पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे सरकारने लक्ष दिले नाही.
भीषण वास्तव
करपे कुटुंबाच्या आत्महत्येनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सुरू झालेले सत्र आजही थांबले नाही. सुमारे साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चाळीस ते पन्नास शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात.
सरकारे बदलली. काँग्रेसची राजवट जाऊन भाजपचे सरकार आले, महाराष्ट्रात भाजपचे सरकार जाऊन महा आघाडीचे सरकार आले. पण शेतकऱ्यांचे हाल थांबले नाहीत. आता परिस्थिती आणखीन बिकट बनली आहे. कालपर्यंत शेतकरी आत्महत्या करीत होते, नवीन आकडेवारीनुसार आता शेतकऱ्यांची मुले म्हणजेच बेरोजगारीही फार मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे, असे पुढे आले आहे. मृत्यूने आता शहरात पोट भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचाही पाठलाग सुरू केला आहे.
आपण काय करू शकतो?
आपण सरकार नाहीत. आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात क्रूर कायदे बदलण्याचे, रद्द करण्याचे अधिकार नाहीत. आपल्या हातात शस्त्रेही नाहीत. वेडाचारही करता येत नाही. मी साधा विचार केला. आपल्या घरात अशी घटना घडली तर आपण काय करतो? किमान एक दिवस आपल्याला अन्नाचा घास जाणार नाही. बस, हाच विचार 19 मार्चच्या उपवासाच्या मागे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना माझ्यासारखा संवेदनशील माणूस त्या दुखाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करण्याच्या पलीकडे काय करू शकतो. उपवास हे सामान्य माणसाचे शस्त्र आहे! ते एकट्याने नव्हे लाखो लोकांनी उचलले तर मी मी म्हणणाऱ्यांना पळता भुई थोडी होऊन जाते. भारतीय जनतेने यापूर्वी या शस्त्राचा वापर केला आहे. तेच शस्त्र पुन्हा उचलण्याची गरज आहे.
साहेबराव करपे कुटुंबियांच्या आत्महत्येच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने, 19 मार्च रोजी एक दिवसाचा उपवास करून आत्महत्या केलेल्या लाखो शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करायची. तसेच शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्प करायचा!
तीन पर्याय
ज्यांना शक्य असेल ते सामूहिकरित्या सार्वजनिक ठिकाणी बसून उपोषण करू शकतात, पण ज्यांना बसणे शक्य होणार नाही, त्यांनी आपापले काम करीत उपवास करावा. खूप केले देवा धर्माचे उपवास. एक उपवास अन्नदात्यासाठी करावा. हवे तर उपवास सोडण्यासाठी एकत्र जमावे. तेही शक्य नसेल तर सोशल मीडियावर जाहीर करावे. शालेय विद्यार्थ्यानी, वृद्ध आणि आजारी लोकांनी उपवास केला पाहिजे असा आग्रह नाही त्यांनी दोन मिनिटे मौन पाळावे. एवढे केले तरी आज पुरेसे आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही मोठी राष्ट्रीय आपत्ती आहे. अन्य देशात एवढ्या आत्महत्यास झाल्या असत्या तर त्या देशाचा झेंडा अर्ध्यावर आणला गेला असता. सगळी कामे थांबवून, देशात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या होणार नाही, याचा विचार केला गेला असता. दुर्दैवाने आपल्या देशाच्या संसदेला दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करता आली नाही. याचा अर्थ असा की, पक्ष कोणताही असला तरी राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत वाटत नाही. सरकार मायबाप नसून ते कायम राक्षसीच असते, हेच दिसून येते. सरकार या आत्महत्यांबद्दल संवेदनशील नसेल, आम्ही तर आहोतना! आपण ही संवेदनशीलता व्यक्त करू! समाज म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडू.
हा उपवास कोणा एका पक्षाचा किंवा संघटनेचा नाही. प्रत्येक संवेदनशील व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकतो. अगदी सरकारी कर्मचारी देखील 19 मार्चला उपवास करू शकतात. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि 19 मार्चचा उपवास ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे.
उपवास का करायचा?
अन्नदात्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आज तो संकटात सापडला आहे. हा उपवास करून आपण अन्नदात्याला दिलासा द्यायचा आहे. शेतकऱ्याची मुलं मुली आज शहरात गेली असली तरी ती शेतकऱ्यांना विसरलेली नाहीत, याची जाणीव करून द्यायची आहे. शेततऱ्याप्रती आपली प्रतिबद्धता बळकट करायची आहे.
हा उपवास कोणत्या मागण साठी नाही पण शेतकरी आत्महत्या का करत आहेत? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? त्या थांबाव्यात यासाठी काय केले पाहिजे? त्यासाठी मी काय करू शकतो? याचा विचार करण्यासाठी एक दिवसाचा हा उपवास आहे. होय, एक दिवस उपवास केल्याने प्रश्न सुटणार नाही हे खरे, पण प्रश्न सुटण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल यात शंका नाही.
आपण जेथे आहात तेथे हा एक दिवसाचा अन्नत्याग करता येईल. मी 19 मार्च 17ला साहेबराव करपे यांच्या गावी जवून महागाव येथे उपोषण केले होते. दुसऱ्यावर्षी त्यांनी जेथे आत्महत्या केली त्या दत्तपुरला भेट देऊन पवनारला उपोषणाला बसलो होतो. तिसऱ्या वर्षी दिल्लीत महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन राजघटवर उपोषण केले. या वर्षी मी आणि माझे अनेक सहकारी पुण्यात म. फुलेंना अभिवादन करून उपोषण करणार आहोत.
तुम्ही कोण्या पक्षाचे, संघटनेचे असा, कोणत्याही विचारसरणीचे असा, व्यावसाय किंवा नोकरी करणारे असा, विद्यार्थी असा, 19 मार्च रोजी एक दिवस उपवास करा! असे नम्र आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करीत आहे.