वाशिम : नरेंद्र मोदी यांची देशव्यापी लाट आणि भावना गवळी यांनी केलेल्या विकासकामांचा सकारात्मक परिणाम म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने पुन्हा एकदा विजय मिळवला. पाचव्यांदा भावना गवळी लोकसभेवर जाणार आहेत. या निवडीनंतर भावना गवळी यांची मंत्रीमंडळाकडे आगेकूच होत आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात भावना गवळींची वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय.
भावना गवळी यांनी काँग्रेस आघाडीचे माणिकराव ठाकरे यांचा तब्बल सव्वा लाख मतांनी पराभव करून शिवसेनेचा हा गड कायम राखला. तर्कवितर्क आणि अफवांना पूर्णविराम देत, निकाल पूर्णपणे आपल्याकडे झुकवून भावना गवळी यांनी या मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयाची नोंद केली. संपूर्ण देशात दिसणाऱ्या ‘नमो’ लाटेने विदर्भात काँग्रेस आघाडीचा जो सुपडासाफ केला त्याला यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघही अपवाद ठरला नाही.
एक्झिट पोलचे अंदाज आणि शिवसेनेच्या अहवालाने सुरुवातीलाच महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या विजयाचा दावा केला होता. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याची खिल्ली उडवत माणिकराव ठाकरे हेच विजयी होणार असा ठाम आत्मविश्वास दर्शविला. एकूणच या सगळ्या परिस्थितीत भावना गवळी यांच्याबाबत ‘अँटीइंन्कबन्सी’ आहे, भाजप त्यांना सहकार्य करणार नाही अशा वावड्या उठायला सुरुवात झाली होती. परंतु संघटन कौशल्य असणाऱ्या भावना यांनी आपल्या विश्वासातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन रणांगणात उडी घेतली.
एकीकडे दिग्गज आणि मुरब्बी राजकारण्यांची फळी, तर दुसरीकडे विश्वासू तरुणाईची नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा या बळावर भावना यांनी संपूर्ण प्रचार राबविला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ग्रामीण स्तरावर पोहोचलेले जाळे आणि त्यांच्या नेत्यांची करडी नजर यातून माणिकराव ठाकरे यांचा विजय होणार असा दावा करण्यात येत होता. पण मतदारराजाच्या मनात ‘नमो’ लाट आणि दांडगा जनसंपर्क असणाऱ्या नेतृत्वाबद्दलची ममतेची ‘भावना’ यातूनच अशक्यप्राय वाटणारा हा विजय भावना गवळी यांनी खेचून आणला.
नमो.. नमो.. च्या वादळात यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वातावरण ‘भावनामय’ होऊन शेवटी शिवसेना, भाजप महायुतीच्या खासदार भावना गवळी विजयी झाल्या. दोन वेळा वाशिम मतदारसंघाचे, तर नवीन मतदारसंघ पुनर्रचनेत वाशिम-यवतमाळ या मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं होतं. नमो.. नमो.. च्या वादळात आणि जनसंपर्काच्या जोरावर विजयाची पंचमी करत संसदेवर धडक मारली.
खासदार भावना गवळी यांच्या विजयासाठी वाशिम – यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जीवाचं राण केलं होतं. योग आल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही असे म्हटले जाते. विविध घटना तसेच अनुभवावरून हे वेळोवेळी सिद्ध झालेले आपण पाहतो. सलग पाचव्यांदा खासदार म्हणून विराजमान झालेल्या भावना गवळी या सुद्धा राजयोग घेऊनच जन्माला आल्याचं दिसून येत आहे. त्यांचे वडील माजी खासदार स्व. पुंडलीकराव गवळी यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेऊन वयाच्या 24 व्या वर्षी 19999 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या, यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असा सलग पाच लोकसभा निवडणुकात विजय मिळविला आहे.
दोन वेळा विरोधी बाकावर बसून विदर्भाचा आवाज बुलंद करताना आता मोदी लाटेत त्यांनी सत्तेत राहून काम केलं. जनतेचे प्रश्न मार्गी लावले. शिवाय मंत्री मंडळातले चार मंत्रीपदाचे दावेदार असणारे खासदार पराभूत झाल्याने शिवसेनेत पाच वेळा खासदार असणाऱ्या एकमेव महिला खासदार आहेत. त्यामुळे मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.