मुंबई : राज्यातील प्रस्तावित मेगाभरतीची प्रतीक्षा अखेर संपण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात 72 हजार जागांच्या मेगाभरतीसाठी जाहिरात निघणार असल्याची माहिती आहे. मंत्रालयात याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता भरतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. फेब्रुवारीपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तब्बल आठ वर्षानंतर राज्य सरकारने नोकरभरतीची घोषणा केली. ज्यात यंदा 36 हजार आणि पुढच्या वर्षी 36 हजार पदं भरली जातील. शिक्षण सेवकांच्या धरतीवर पहिली पाच वर्ष मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर कामगिरी आणि पात्रता बघून नोकरीत कायम केलं जाणार आहे. पण ही भरती स्थगित करण्यात आली होती.
कोणत्या खात्यात किती जागा?
राज्य सरकारने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य खात्यात 10 हजार 568 पदं, गृह खात्यात 7 हजार 111, ग्रामविकास खात्यात 11 हजार, कृषी खात्यात 2500, सार्वजनिक बांधकाम खात्यात 8 हजार 337, नगरविकास खात्यात 1500, जलसंपदा खात्यात 8227, जलसंधारण खात्यात 2 हजार 423, पशुसंवर्धन खात्यात 1 हजार 47 आणि मत्स्य खात्यात 90 पदं भरली जाणार आहेत.
शिक्षक भरतीतही मराठा समाजाला राखीव जागा
शिक्षकांच्या प्रस्तावित 24 हजार जागांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के जागा मिळणार आहेत. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा कालच झाली, त्यानंतर आता तातडीने अंमलबजावणीही होणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली होती.