मुंबई : देशात नवीन वाहन कायद्यानुसार (Vehicle Act) नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच ट्रॅफिक नियमांच्या (Traffic Rules) दंडामध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा फटका खिशाला बसणार आहे. आता चप्पल आणि सँडल घालून जर बाईक चालवली तरीही दंड भरावा लागेल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
“बाईक चालवताना चप्पल आणि सँडलचा वापर केला, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. चप्पल आणि सँडल घालून बाईक चालवणे हे ट्रॅफिक नियमांच्या विरोधात आहे. हा खूप जुना नियम असून सक्तीने लागू करण्यात येत नव्हता. पण आता जर चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवली तर दंड भरावा लागणार. गिअर असलेली बाईक तुम्ही चप्पल आणि सँडल घालून चालवली तरच तुमच्यावर कारवाई होऊ शकते”, असं ट्रॅफिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूर्वीपासून हा नियम आहे. पण आता ट्रॅफिक नियम कठोर केल्याने हा नियमही सक्तीने लागू करण्यात येत आहे. त्यामुळे गिअर बाईक चालवताना चप्पल किंवा सँडल घालणे प्रत्येकासाठी धोकादायक ठरु शकते.
दरम्यान, “ट्रॅफिकच्या या नियमावरुन विरोधकांकडून विरोध होत आहे. माझ्या गरीब भाऊ-बहिणींनो सतर्क राहा. गावचा शेतकरी, कामगार, गरीब विद्यार्थी आता चप्पल घालून बाईक चालवू शकत नाही. मोदी-योगींच्या राज्यात सूट-बूट घालून बाईक चालवावी लागेल. नाहीतर जोगी बाबा यांची पोलीस हजारो रुपयांचा दंड आकारु शकते”, असं ट्वीट समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी केलं.
नव्या नियमांवर एक नजर
1. विनातिकीट प्रवास केल्यास पाचशे रुपये दंड
2. अधिकाऱ्यांचा आदेश न मानल्यास दोन हजार रुपये दंड
3. ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड
4. अपात्र असताना वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड
5. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक हजार रुपये दंड
6. धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड
7. दारु पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रुपये दंड
8. ओव्हरस्पीड किंवा रेसिंग केल्यास पाच हजार रुपये दंड
9. वाहन परवान्याचे नियम तोडल्यास 25 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद
10. वाहनात अतिरिक्त सामान भरल्यास दोन हजार रुपयांहून जास्त दंड
11. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रत्येकामागे एक हजार रुपये दंड
12. सीटबेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड
13. स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास दोन हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द
14. हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द
15. अँब्युलन्स, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास दहा हजार रुपये दंड
16. इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवल्यास दोन हजार रुपये दंड
17. अल्पवयीन पाल्याने गाडी चालवताना अपघात झाल्यास पालकांना तीन वर्ष तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणीही रद्द