ठाणे : भिवंडीतील प्रेरणा कम्पाऊंड येथील एका केमिकल गोडाऊनला मध्यरात्री एकच्या सुमारास लागलेली आग अजूनही धुमसत आहे. भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रेरणा कम्पाउंड येथे ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळावर प्रयत्न करत आहेत. आग मोठी असल्याने आगीवरील नियंत्रण मिळवण्यासाठी जास्त वेळ लागत आहे.
आग धुमसत असून ती विझवण्यासाठी भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर एमआयडीसीच्या अग्निशामक गाड्या शर्थीचे प्रयत्न करत आहेत. गायत्री कॉम्प्लेक्स येथे पाण्याची कमतरता भासत असल्याने आग विझवण्यासाठी अजून 12 तास लागू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. आग लागलेलं गोडाऊन 1 लाख स्क्वेअर फूट इतकं अवाढव्य आहे. त्यात रबर साठवलेले होते. त्यामुळे आग झपाट्याने वाढली आहे.
मुंबई आणि परिसरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. याआधीही झालेल्या घटनांमध्ये नागरिकांना जीव गमवावे लागले होते. मात्र, आग लागल्यास उपाययोजना म्हणूनच्या व्यवस्था तोकड्याच पडत असल्याचे दिसत आहे. तसेच संबंधित कंपन्यांना परवानगी देताना आगीवर नियंत्रण मिळवण्याची मुलभूत साधनांचीही तपासणी किती गांभीर्याने होत आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.