धुळे : जिल्ह्यातील दोंडाईचा (Dondaicha) येथील के. एस. कोल्ड स्टोरेजला (K S Cold Storage) भीषण आग (Fire) लागली. रात्री 8 वाजता लागलेली आग 12 तासानंतरही सुरू होती. अग्निशामक दलाला 12 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. इमारत उंच असल्याने आग विझवण्यात अग्निशामक दलाला अनेक अडथळे आले. आग प्रथम स्टोरेजच्या सातव्या मजल्याला लागली. त्यानंतर हळूहळू संपूर्ण मजल्यांमध्ये आग पसरली. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कैलास कांतीलाल जैम असं कोल्ड स्टोरेजच्या मालकाचं नाव आहे.
आग लागलेली इमारत 5 मजली असल्यामुळे अग्निशामक दलाला आग विझवण्यात मोठे अडथळे आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुरुवातीला जोंडाईचा, शिंदखेडा, शहादा, नंदुरबार, शिरपूर, अमळनेर, चोपडा आणि धुळे येथील अग्नीशमन दलांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे नाशिक, सुरत येथून अग्निशामक दलाची पथकं बोलावण्यात आली. सुरत येथील सुसज्ज आणि अत्याधुनिक पथकाने आग नियंत्रणात आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
सध्या आग पूर्णपणे शमलेली नसली, तरी पूर्णपणे नियंत्रणात आहे. आग लागलेले कोल्डस्टोरेज पूर्णपणे शेतमाल आणि किराणामालाने भरलेले होते. स्टोरेजची क्षमता 16,000 मेट्रीक टनची होती. त्यात 65,000 पोत्यांमध्ये माल भरलेला होता. प्राथमिक अंदाजानुसार आगीत 15 ते 20 कोटी रूपयांचे नुकसान झाले. आग सायंकाळपर्यंत पूर्णपणे विझेल. त्यानंतरच नुकसानीचा खरा आकडा समजेल.
धुळ्यात मागील 3 दिवसातील आगीची (Dhule Fire) ही दुसरी मोठी घटना आहे. 31 ऑगस्टला शिरपूर येथील रुमित केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट (Dhule chemical factory blast) झाला होता. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला होता, तर 70 जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी फॅक्टरी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (homicide case) दाखल केला होता.
शिरपूर येथील आग केमिकल फॅक्टरीच्या बॉयलरमध्ये स्फोट (Dhule chemical factory blast) झाल्याने लागली होती. मृत 13 कामगार मध्यप्रदेश, गुजरातमधील आदिवासी भागातील रहिवासी होते.